मुंबई – मी काल शरद पवारांसोबत होतो आणि पुढेही राहणार आहे. माझ्याकडून पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मी अमित शहांना भेटलो याबद्दल तुम्ही संशोधन करा. या बातम्या घरी बसून केल्या गेल्या आहेत, असे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
जयंत पाटील म्हणाले, माझी अमित शहा यांच्यासोबत काहीच चर्चा झाली नाही. मी केवळ शरद पवारांशी चर्चा करत माझ्या घरी येत आहे. अजित पवार गटाकडून अशा बातम्या पेरतात असे मी म्हणणार नाही. कारण बातम्या पेरणारे तुम्हीच आहात. असा गैरसमज पसरवणे चुकीचे आहे, बातमी देणाऱ्यांनी अभ्यास करुन बातमी द्यायला हवी.
संध्याकाळी मी शरद पवारांच्या घरी होतो. त्यानंतर मी आणि काही सहकारी माझ्या निवासस्थानी रात्री दीड वाजेपर्यंत चर्चा करत बसलो होतो. यानंतर मी सकाळी पुन्हा साहेबांची भेट घेतली.
आता या वेळेत मुंबईहून पुण्यात जाणे आणि तिथून इथपर्यंत येणे केवळ अलाउद्दीनच्या चिरागातूनच शक्य आहे. मी शरद पवार यांच्यासोबत आहे. लोकांमध्ये माझ्याबद्दल संभ्रम पसरवला जात आहे. पण महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे की मी काय आहे.
चर्चा काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज सकाळी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांची भेट घेतली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी अमित शहांची भेट घेण्यापूर्वी अजित पवार यांनी जयंत पाटील यांना फोन केला होता. यावेळी त्यांना शहांच्या भेटीसाठी अजित पवारांनी बोलावले होते. त्यानंतर जयंत पाटील व अमित शहा यांची भेट झाल्याची माहिती आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना पुन्हा जोर
दरम्यान, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे 4 विद्यमान आमदार अजित पवार गटासोबत येणार असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. तसेच, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे.
15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या आगे-मागे हा मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार होईल. त्यामध्ये 6 भाजपला, 4 शिंदे गटाला आणि अजित पवार यांच्या गटाला 4 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.