मुंबई – गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने नेतृत्त्वात बदल केला आहे. राष्ट्रवादीचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष शंकरसिंह वाघेला यांना पदावरून हटवित त्यांच्या जागी माजी आमदार जयंत पटेल यांची वर्णी लावण्यात आली आहे.
गुजरातमध्ये राज्यसभेच्या जागेसाठी 19 जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीचे पक्ष नेतृत्वामध्ये आणि प्रदेशाध्यक्ष शंकरसिंह वाघेला यांच्यात एका आमदाराच्या पाठिंब्यावरून मतभेद झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा देण्याबद्दल वाघेला हे आग्रही होते. त्यावरूनच मतभेद झाल्याचे बोलले जात आहे.
या निवडीनंतर नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल म्हणाले, पक्षाने शंकरसिंह वाघेला यांच्याकडील नेतृत्त्व दुसऱ्याकडे देण्याचा निर्णय घेतला. तसेच आदेश् पक्षाने पाठवले आहे. उद्या शंकरसिंह वाघेला यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. जयंत पटेल हे आनंद जिल्ह्यातील उमरेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. तर वाघेला हे दीड वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष पदावर कार्यरत होते.
पक्षातील बदलाविषयी वाघेला म्हणाले, मी पक्षाचा राष्ट्रीय महासचिव पदावरून काम करतच राहणार आहे. मी गुरूवारी एक पत्रकार परिषद बोलवणार आहे. तोपर्यंत मला काहीही बोलायचे नाही, असे वाघेला यांनी सांगितले. दरम्यान, राज्यसभेच्या चार जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत भाजपाने तीन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर कॉंग्रेसकडून ज्येष्ठ नेते शक्तीसिंह गोहिल व भारतसिंह सोळंकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमध्ये राष्ट्रवादीचा एकच आमदार असून, हे मत कुणाला असेल याबाबत अद्यापही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.