भुसावळ – फॅक्टरीतील भरलेल्या ऑईल टाकीला वेल्डिंग करताना स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना सुनसगाव (ता. भुसवार) रस्त्यावरील दिया कॉपर मास्टर अलायन्स कंपनीत आज (दि. 21) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. काशिनाथ सुरवाडे, खेमसिंग पटेल अशी अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरवाडे आणि पटेल हे दोघे ऑईलच्या टाकीला वेल्डिंग करत होते. यावेळी अचानक स्पार्किंग होऊन मोठा स्फोट झाला. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच भुसावर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखेडे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.