नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष जेकब झुमा यांना निवडणूक आयोगाने निवडणूक लढवण्यास अपात्र घोषित केले आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये २९ मे रोजी होत असलेल्या निवडणुकांमधील झुमा यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला गेला आहे. या आक्षेपांना निवडणूक आयोगाने वैध ठरवले आहे.
२००९ ते २०१८ दरम्यान अध्यक्ष असताना आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले होते. झुमा यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या या आरोपांची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या न्यायालयीन आयोगासमोर उपस्थित न झाल्याबद्दल झुमा यांना २०२१ मध्ये १५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र दोनच महिन्यांनंतर त्यांना वैद्यकीय कारणास्तव पॅरोल मंजूर झाला होता आणि उर्वरित शिक्षा नजरकैदेत पूर्ण करण्याची सूट मिळाली होती.
न्यायालयाकडून दोषी ठरवलेल्यांना आणि १२ महिन्यांपेक्षा जास्त शिक्षा झालेल्या व्यक्तींना दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेने सार्वजनिक पद स्वीकारण्यास बंदी घातली आहे.
झुमा यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायालयीन आयोगाच्या कामकाजावर झुमा आणि त्यांच्या समर्थकांनी जोरदार आक्षेप घेतले होते. दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशाच्या गुप्ता कुटुंबीयांनी सरकारमधील नियुक्त्यांमध्ये मोठा प्रभाव टाकल्याचाही आरोप झुमा यांच्या सरकारवर होतो आहे. या न्यायालययीन आयोगाच्या सुनावणीसाठी झुमा यांना २ एप्रिल रोजी उपस्थित व्हायचे आहे.
झुमा यांचा मखोंतो विसिझव् पार्टी हा दक्षिण आफ्रिकेच्या राजकारणातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. सत्तारुढ आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर झुमा यांनी या नवीन पक्षाची स्थापना केली होती.