– महापालिका आयटीआयचा उपक्रम
पिंपरी, दि. 15 – औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून शिक्षण घेतल्यावर केवळ कामागार म्हणून शहरातच न रहाता परदेशात जाऊन पुढील उच्च शिक्षण घेणे व त्याद्वारे तेथेच नोकरी, रोजगार करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे परदेशात आपला रोजगार, व्यावसायात जम बसविण्याचे स्वप्न साकार होणार असून त्यासाठी महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राने पुढाकार घेतला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी यांच्या माध्यमातून शहरातील विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) ट्रेडस उत्तीर्ण केल्यानंतर परदेशातील उच्च शिक्षण (डिप्लोमा, डिग्री) घेता येईल. त्याद्वारे परदेशातील रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. त्यासाठी महापालिकेच्या सामाजिक विकास विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून उच्च शिक्षणाबाबत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच व्हिसा, इंग्रजी भाषा कोर्सची फी महापालिका धोरणाच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे. पुढील काळात या विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील असे काही स्किल डेव्हलोपमेंट कोर्सेस, ज्यात आर्टिफिशीअल इंटेलिजन्स, ऑटोमेशन, कॅड / कॅम, इलेक्ट्रिकल व्हेईकल मेन्टेनन्स ऍण्ड रिपेअर आदी कोर्सेस आयटीआय कॉलेजमध्येच करता येतील.
या कोर्सेसचा समावेश
आयटीआयच्या विद्यार्थ्यांना परदेशातील अनेक विद्यापीठे, कॉलेजेस, इन्स्टिट्यूट्स आणि ट्रेनिंग देणाऱ्या संस्थांमध्ये वेगळ्यावेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. आयटीआयच्या सर्व ट्रेडस इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोटिव्ह आणि इतर पुढील ऍडव्हान्स कोर्सेसचा यात समावेश आहे.
येथे नोकरीच्या संधी
जर्मनी, जपान, कॅनडा आणि इतर देशात उपलब्ध असणाऱ्या इंटर्नशिप बरोबर जॉब प्रोग्रॅम्सनाही प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना इंग्रजी परीक्षा (IELTS / PTE) पास करणे आवश्यक आहे. त्याचे ट्रेनिन्ग अर्थसेतू संस्थेमार्फत देण्यात येणार आहे. या संधीसाठी महापालिकेच्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे महापालिकेचे सोशल ट्रान्सफॉर्मेशनचे उद्दिष्ट साध्य करण्यात येईल. येथील नागरिकांचे विशेष करून युवक युवतींचे जीवनमान उंचावण्यास निश्चितच सहाय्य करण्यात येईल.
आज कार्यशाळा
याबाबत विद्यार्थी व पालकांसाठी कार्यशाळा गुरुवारी (दि. 16) दुपारी 2 ते 5.30 वाजेपर्यंत चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ग्राड ड्रीम्स अर्थसेतू या संस्थेच्या माध्यमातून आयोजित केले आहे. तरी सदर सेमिनार व संधीचा लाभ घेण्याकरिता करीता महानगरपालिका रहिवासी आयटीआय /डिप्लोमा विद्यार्थ्यांनी पालकांसहीत उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य शशिकांत पाटील यांनी केले आहे.