पुणे – राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रत्यक्ष प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यास व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आयटीआय वर्ग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझर या गोष्टीची दक्षता घेणे आवश्यक आहे. आयटीआयच्या अनुक्रमे दोन वर्षे आणि एक वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण त्वरित सुरू करण्यात यावे.
या प्रशिक्षणार्थ्यांची पुढील महिन्यात दिल्ली येथील प्रशिक्षण संचालनालयामार्फत परीक्षा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रशिक्षणार्थींच्या प्रशिक्षणास प्रथम प्राधान्य देण्यात यावे, असे नमूद केले आहे.
प्रथम वर्षातील प्रशिक्षण दि. 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत पूर्ण करण्यात यावे. एक किंवा दोन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण प्रवेश प्रक्रिया संपुष्टात येताच ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात यावेत.