fbpx

एचडीएफसी बॅंक व जेट एअरवेज तेजीत

मुंबई -दुसऱ्या तिमाहीत एचडीएफसी बॅंकेने नफा वाढलेला ताळेबंद जाहीर केल्यामुळे या बॅंकेच्या शेअरचे भाव सोमवारी वाढले. जेट एअरवेजच्या पुनरुज्जीवनाची शक्‍यता दृष्टिपथात आल्यामुळे या कंपनीच्या शेअरच्या भावातही या आठवड्यात वाढ होत आहे.

सप्टेंबरअखेर संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत एचडीएफसी बॅंकेचा नफा 16 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. या बॅंकेला दुसऱ्या तिमाहीत तब्बल 7,703 कोटी रुपयांचा नफा झाला. केवळ नफा वाढलेला नाहीतर ढोबळ एनपीए कमी होऊन 1.08 टक्‍क्‍यांवर आले आहे. निव्वळ एनपीए केवळ 0.17 टक्‍के इतके नोंदले आहे.

एचडीएफसी बॅंकेने चमकदार ताळेबंद जाहीर केल्यामुळे बॅंकेच्या शेअरच्या भावात 0.36 टक्‍के वाढ झाली. त्याचबरोबर बॅंकिंग क्षेत्रातील इतर कंपन्यांचे शेअर वधारले. त्यामध्ये आयसीआयसीआय बॅंक, ऍक्‍सिस बॅंक, स्टेट बॅंक, एचडीएफसी, कोटक बॅंकेचा समावेश होता.

जेट एअरवेज कंपनीला गुंतवणूकदार मिळाले आहेत. या कंपनीला कर्ज देणाऱ्या बॅंकांनी गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे जेट एअरवेज पुन्हा आकाशात उडण्याची शक्‍यता वाढली आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरचे भाव गेल्या आठवड्यात वाढले आहेत. आज या कंपनीच्या शेअरचा भाव 4.98 टक्‍क्‍यांनी वाढून 42 रुपये 20 पैसे प्रति पातळीवर गेला.

एचडीएफसी बॅंक, इन्फोसिस, विप्रो, एचसीएलटेक या कंपन्यांनी आतापर्यंत दुसऱ्या तिमाहीचे ताळेबंद जाहीर केले आहेत. या ताळेबंदातील नफा आणि उलाढाल अपेक्षेपेक्षा जास्त आहे. या कारणामुळे शेअरबाजारात खरेदीचे वातावरण होते. वाहन विक्री झपाट्याने वाढत असल्यामुळे वाहन कंपन्यांच्या शेअरकडे गुंतवणूकदार आकर्षित होऊ लागले आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.