IT Raids: तेलंगणामध्ये या महिन्याच्या शेवटी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. मात्र मतदानापूर्वी राज्यात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि प्राप्तिकर विभागाकडून सातत्याने छापे टाकले जात आहेत. त्यातच आज सकाळी तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. प्राप्तिकर विभागाची टीम एकूण 14 ठिकाणी छापे टाकत असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
आयकर विभागाचे अधिकारीआज सकाळी तेलंगणाच्या मंत्री सबिता इंद्रा रेड्डी यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापेमारी करत आहे. गचीबोवली येथील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या प्रदीप नावाच्या व्यक्तीच्या घरावर आयकर अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, प्रदीप तेलंगणाच्या मंत्री सविता इंद्रा यांचा जवळचा नातेवाईक आहे. इतकंच नाही तर टीमने रेड्डी यांच्या इतर नातेवाईकांच्या ठिकाणांचाही शोध घेतला आहे.
हैदराबादमधील एका मोठ्या फार्मा कंपनीवर अधिकारी सध्या छापे टाकत आहेत. तसेच शहरातील विविध १५ ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या आहेत. फार्मा कंपनीच्या मालकाचे घर आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यालयांची आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून झाडा-झडती सुरु आहे. डॉ. रेड्डीज लॅबमध्ये मार्केटिंगचे काम करणार्या कोटला नरेंद्र रेड्डीवर छापा टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यापूर्वीही राज्यातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सातत्याने छापे टाकण्यात येत आहेत. सोमवारी छाप्याच्या दोन दिवस आधी आयकर विभागाच्या पथकाने तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील काँग्रेस नेते पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांच्या घरावर छापा टाकला होता. काँग्रेस नेते सध्या प्रचारात व्यस्त आहेत. रेड्डी यांनी अलीकडेच बीआरएसमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते लोकसभेचे सदस्यही राहिले आहेत.