IPL 2024 : सुनील नरेनने रचला इतिहास, आयपीएलमध्ये ‘हा’ पुरस्कार तीनदा जिंकणारा ठरला पहिला खेळाडू…

IPL 2024, Sunil Narine created history : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्स संघाला तिसऱ्यांदा विजेते बनवण्यात सुनील नरेनने बॉल आणि बॅट दोन्हीसह महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या काही सीझनमध्ये नरेन त्या फॉर्ममध्ये दिसला नव्हता, पण आयपीएल 2024 मध्ये त्याचा तोच जुना फॉर्म पुन्हा एकदा मैदानावर पाहायला मिळाला.
आयपीएलच्या 17 व्या मोसमात सुनील नरेनने केकेआर संघाकडून डावाची सुरुवात बॅटने करण्याची जबाबदारी पार पाडतानाच चेंडूनेही चमकदार कामगिरी करून दाखवली. या मोसमात नरेनला त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतकही झळकावण्यात यश आले. अंतिम सामन्यानंतर सुनील नरेनला या हंगामातील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयरचा पुरस्कारही देण्यात आला, जो जिंकून त्याने एक विशेष विक्रमही केला.
सुनील नरेन आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा किताब पटकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. या मोसमात त्याने आपल्या बॅटने 488 धावा केल्या, तर 17 विकेट्सही आपल्या नावावर करण्यात त्याला यश आले.
आयपीएल 2012 मध्ये जेव्हा KKR संघाने पहिल्यांदा IPL चे विजेतेपद पटकावले तेव्हा नरेनचा तो IPL चा पहिलाच मोसम होता आणि त्याने त्यात 24 विकेट्स घेतल्या आणि पहिल्यांदाच मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयरचा पुरस्कार पटकावला होता. यानंतर, 2018 मध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल सीझनमध्ये सुनील नरेनने गोलंदाजीत 17 विकेट घेतल्या, तसेच बॅटने 357 धावा काढल्या आणि दुसऱ्यांदा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयरचा पुरस्कार जिंकला होता.
IPL 2024 च्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सुनील नरेनला बॅटने काही खास पराक्रम दाखवण्यात यश आले नाही आणि केवळ 6 धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सुनील नरेन 9व्या स्थानावर आहे. या मोसमात नरेनच्या बॅटमधून एकूण 33 षटकार आणि 50 चौकार आले . या मोसमात नरेनचा स्ट्राईक रेट 180 होता.





