इस्लामाबाद: 9 नोव्हेंबर रोजी कर्तारपूर कॉरिडोरच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पाकिस्तानने कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांना आमंत्रित केले आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पार्टी (पीटीआय) च्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानने नवजोतसिंग सिद्धू यांना करतारपूर कॉरिडोर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रण पाठवले आहे.
पंतप्रधान इम्रान खान यांच्या सूचनेनुसार पाकिस्तानी सिनेटचा सदस्य फैसल जावेद खान यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी संपर्क साधून त्यांना नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तानला बोलावले आहे.
यापूर्वी सिद्धू यांनी इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित दर्शवली होती. दरम्यान, पाकिस्तानचे लष्कर प्रमुखांना मिठी मारल्याबद्दल नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर कडक टीका झाली होती. सिद्धू यांनी त्यांच्या भेटीदरम्यान कर्तारपूर कॉरिडॉरचा मुद्दाही उपस्थित केला होता.
कर्तारपूर कॉरिडोरचे उद्घाटन 9 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान आणि भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. करतारपूर साहिबला जाणाऱ्या 575 यात्रेकरूंची यादी भारताने पाकिस्तानबरोबर शेअर केली. हे सर्व भाविक 9 नोव्हेंबर रोजी करतारपूर साहिब येथे जाणाऱ्या तुकडीचा भाग असतील. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, हरसिमरत कौर बादल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासह पंजाबचे अनेक खासदार आणि आमदार असतील.
काय आहे कर्तारपूर साहिब कॉरिडोर
पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यात डेरा बाबा नानक ते पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ कर्तारपूर साहिब पर्यंत एक कॉरिडोर आहे. यामुळे पाकिस्तानमधील रावी नदीच्या काठावर स्थित गुरुद्वारा करतारपूर साहिब येथे जाणाऱ्या भारतीय शीख भाविकांना मोठ्या प्रमाणात मदत होते. या जागी शिखांचे गुरु नानक देव यांनी आयुष्याची १८ वर्षे घालविली होती. हा कॉरिडोर सुमारे ५ किलोमीटर लांबीचा आहे.