पुणे – अष्टविनायक फर्ममधील गुंतवणूकदार असलेल्या एका संगणक अभियंत्याने आत्महत्या केली. त्याच्याप्रमाणे इतरही उच्चशिक्षीत गुंतवणूकदार बॅंकांच्या तगाद्याला वैतागले आहेत. यामुळे काही गुंतवणूकदार नैराश्यात गेले आहेत, तर काही भयभीत आहेत. या सर्वांचे आर्थिक गुन्हे शाखेकडून समुपदेशन करण्यात येत आहे. गुंतवणूकदारांनी नैराश्यात आणि भीतीपोटी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असा सल्ला दिला जात आहे.
यासंदर्भात सहायक पोलीस आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) आप्पासाहेब शेळके यांनी सांगितले, “आम्ही गुंतवणूकदारांचे समुपदेशन करण्यावर भर दिला आहे. तसेच बॅंकांनाही सामोपचाराची भूमिका घेण्यास सांगितले आहे. यामुळे गुंतवणूकदार कोणतेही टोकाचे पाऊल उचलणार नाहीत. आम्ही मुख्य आरोपीच्या मागावर आहोत.’
…असे आहे प्रकरण
सेल्वाकुमार नडार (रा. कोंढवा खुर्द) याच्यासह साथीदारांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सचिन पवार (रा. वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी नडार आणि साथीदारांनी अष्टविनायक इन्व्हेस्टमेट नावाने लष्कर भागातील न्यूक्लिअस मॉल परिसरात कार्यालय सुरू केले होते. त्यांनी गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखविले होते. त्यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी योजना जाहीर केल्या. काही जणांना त्वरित कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आमिष दाखविले होते.
कर्ज मंजुरी प्रक्रियेसाठी नडार याने पैसे उकळले होते. तक्रारदार पवार यांचा विश्वास संपादित करुन त्यांना कर्ज उपलब्ध करुन दिले होते. तक्रारदाराच्या खात्यावर जमा झालेली 40 लाख 89 हजार 152 रुपये नडारने अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटच्या खात्यात जमा करुन घेतली. पवारसह 200 जणांकडून आरोपींनी वेगवेगळी कारणे सांगून 300 कोटी रुपये उकळल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे 17 गुंतवणूकदारांनी सात कोटी रु., तर 65 गुंतवणूकदारांनी 50 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे जबाब दिले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर तपास करत आहेत.
…असे हेरायचे गुंतवणूकदारांना
अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट या संस्थेतील प्रतिनिधी गुंतवणूकादारांकडून पैसे घेऊन ते शेअर बाजार, कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करायचे. या रकमेतून मिळालेल्या नफ्यातील काही हिस्सा गुंतवणूकादारांना दिला जायचा. तसेच एखाद्याला कर्ज उपलब्ध करुन दिल्यास काही हप्ते फेडले जायचे. ज्यांनी गृहकर्ज, वाहन कर्ज घेतले आहे, अशा कर्जदारांशी अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटच्या प्रतिनिधीकडून संपर्क साधला जात होता.