एक जानेवारीच्या अनुषंगाने कोरेगाव भीमात बंदोबस्ताची घेतली माहिती
वाघोली/ शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) व पेरणे (ता. हवेली) येथे एक जानेवारी शौर्यदिनी विजयरणस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या समाज बांधवांच्या सुविधांसाठी ठेवण्यात येत असलेल्या सुविधा, बंदोबस्ताची आज कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी पाहणी करीत माहिती घेतली आहे.
कोरेगाव भीमासह पेरणे ता. हवेली येथे एक जानेवारी रोजी होणाऱ्या विजयरणस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीस प्रशासनाकडून सुरूवात केली आहे.
डॉ. सुहास वारके यांनी आज पेरणे फाटा, कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक याठिकाणी भेट देत पाहणी केली. यावेळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी, ऐश्वर्या शर्मा, शिक्रापूर व लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. वारके यांनी लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेली पार्किंग व्यवस्था, शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेली पार्किंग व्यवस्था, समाज बांधवांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. यावेळी डॉ. वारके यांनी वढू बुद्रुक येथे भेट दिली. शौर्यदिनाच्या कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज असल्याची ग्वाही डॉ. वारके यांनी दिली.