देहूगाव (वार्ताहर) – तीर्थक्षेत्र देहू येथे पुणे जिल्ह्यातील “रोल मॉडेल’ बनविलेल्या निवारा केंद्राची पाहणी केंद्रीय आरोग्य पथकाचे प्रमुख संजय मल्होत्रा यांनी शनिवारी (दि. 25) केली. पाहणीनंतर या पथकाकडून समाधान व्यक्त केल्याचे स्थानिक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
देहूगाव वैकुंठगमन येथे करोना व्हायरसपासून निराधार, बेघर, गोरगरीब आणि बांधकाम मजूर यांचा बचाव, निवारा आणि अन्न-पाण्याच्या सोयी-सुविधांसाठी तयार करण्यात आलेल्या निवारा केंद्राची पाहणी केंद्रीय आरोग्य पथकाचे प्रमुख संजय मल्होत्रा यांनी केली.
देहूतील निवारा केंद्रात असलेल्या 110 जणांची विचारपूस ही केली. तेथील असलेले स्वयंपाक घर, स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य यांची पाहणी केली. त्यांना येणारा खर्च, अन्न पुरवठ्यासाठी लागणारा साहित्याचा होणारा पुरवठा, कोणती त्रुटी आहे का? अशा संदर्भात जिल्हा उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, अप्पर तहसीलदार गीता गायकवाड, मंडलाधिकारी गणेश सोमवंशी, तलाठी अतुल गीते, सरपंच पूनम काळोखे, उपसरपंच स्वप्नील काळोखे यांसह शिवजयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते आदींशी चर्चा करण्यात आली.
नागरी हक्क जनजागृती सामाजिक मंचचे अध्यक्ष प्रकाश काळोखे, सामाजिक कार्यकर्ता विशाल काळोखे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली काळोखे, वैद्यकीय अधिकारी किशोर यादव, डॉ. शिल्पा नारायण आदी यावेळी उपस्थित होते.