लंडन – संपूर्ण जगाला भंडावून सोडणाऱ्या मलेरिया या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अनोखा प्रयोग सध्या करण्यात येत असून मलेरिया रोगाच्या प्रसारास जबाबदार असणाऱ्या डासांच्या मादीची प्रजनन क्षमता नष्ट करण्याचा हा प्रयोग आहे.
लंडनमधील इंपिरियल कॉलेज आणि लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन यांच्या संयुक्त सहकार्याने हा प्रयोग करण्यात येत आहे. यासाठी वैज्ञानिकांनी डासांची एनीफीलइस गांबिया या जातीची निवड केली आहे. जगात सर्वत्र दरवर्षी मलेरियामुळे लाखो लोकांचा मृत्यू होतो.
हे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी आता नवनवीन संशोधन करायला सुरुवात केली असून हे संशोधन त्याचाच एक भाग आहे. मलेरियाच्या फैलावास जबाबदार असणाऱ्या डासांच्या मादीची प्रजननक्षमता नष्ट करून डासांची संख्या कमी करण्याकडे या संशोधनाचा कल आहे.
संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जगात डासांच्या तीन हजार पेक्षा जास्त जाती असून त्यापैकी काही ठराविक डास मलेरियाचा फैलाव करतात. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या वर्षी जगभरात 23 कोटी लोकांना मलेरिया झाला होता. त्यापैकी 4 लाख रुग्णांचा मृत्यू झाला.
या रुग्णांमध्ये पाच पेक्षा कमी वय असणाऱ्या बालकांचा जास्त समावेश होता. सध्या करोना महामारी सुरू असल्याने या कालावधीमध्ये मलेरियामुळे मरणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा धोकाही शास्त्रज्ञाने बोलून दाखवला आहे. जगातील सर्व देशांत फक्त चीन हा सध्या मलेरिया मुक्त आहे.
त्यासाठी त्यांनी 70 वर्षे प्रयत्न केले आहेत 1940च्या दशकामध्ये चीनमध्ये दरवर्षी मलेरियाचे तीन कोटी रुग्ण असायचे; पण गेल्या काही कालावधीमध्ये चीनमध्ये मलेरियाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. सध्या शास्त्रज्ञ ज्या प्रकारे संशोधन करत आहेत, त्या संशोधनाला यश मिळाले तर जगात सर्वत्रच मलेरियावर नियंत्रण ठेवण्यात मोठा हातभार लागणार आहे.