जामखेड (प्रतिनिधी) -शेतीच्या वादातून भावकीच्या दोन गटांत आठ दिवसांपूर्वी लाठी, काठी, दगडाने मारहाण झाली होती. त्यात एका युवकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यास उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा शनिवारी (दि.23) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांनी सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही गटांकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून, एकूण अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोन्ही गटांतील सात आरोपीं अटक केले आहे.
या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अमोल अशोक वराट (रा. साकत) यांनी पहिली फिर्याद दिली आहे. त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे वडील अशोक वराट हे आपण आपली जमीन मोजून घेऊ, म्हणजे आपले वाद मिटतील, असे म्हणाले. त्याचा अजय वराट व विजय वराट यांना राग आला. त्यामुळे त्यांनी 16 मे रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आमच्या घरासमोर गैरकायद्याची मंडळी जमा करून लाकडी दांडके, दगड, काठ्याने आपणास व आपल्या वडिलांस मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी घराबाहेर झोपलेल्या ओंकार वराट याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार केल्याने तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्यास नगर येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
उपचारादरम्यान शनिवारी (दि.23) सकाळी 7.45 वाजता उपचारादरम्यान ओंकार वराट (वय 19) याचा मृत्यू झाला. मयताचा भाऊ अमोल अशोक वराट यांच्या फिर्यादीवरून आरोपी किरण नागनाथ वराट, अजय किरण वराट, विजय किरण वराट, सुदाम किरण वराट, उद्धव नागनाथ वराट, विनोद उद्धव वराट, बाळू उद्धव वराट (सर्व रा. साकत, ता. जामखेड) अशा एकूण सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे.
अजय किरण वराट यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी शेतात जनावरांना पाणी पाजण्यासाठी जात आसताना बाजीराव वराट याने मोटारसायकल अडवून तू मोटार चालू करण्यासाठी टाकलेली वायर का तोडली, अशी विचारणा केली. त्यावर ती वायर आमच्या शेतातून जात होती म्हणून तोडली, असे सांगितल्याचा राग आल्याने बाजीराव वराट याने डोक्यात दगड मारून जखमी केले.
तसेच इतर आरोपींनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. त्यानुसार अशोक कुंडलीक वराट, बाजीराव अशोक वराट, अमोल अशोक वराट व ओंकार अशोक वराट (मयत) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास साहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण करत आहेत.