* निमोण येथील बळींची संख्या दोनवर
* नाशिक येथे सुरू होते उपचार
संगमनेर (प्रतिनिधी) – तालुक्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शनिवारी (दि.23) निमोण गावातील एका करोनाबाधित व्यक्तीचा नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच त्याच्या संपर्कातील दोन व्यक्तीही करोनाबाधित असल्याचा अहवाल आला आहे. आतापर्यंत निमोणमधील दोघांचा व शहरातील एकाचा, असा तिघांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
निमोण येथील एक व्यक्ती करोनाबाधित आढळून आली होती. तिच्यावर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शनिवारी (दि.23) रोजी या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या त्याच्या आईचा व पत्नीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये करोनाचे रुग्ण कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
मृत झालेल्या व्यक्तीच्या आईसह पत्नीचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. एकाच घरातली तीन जण करोनाबाधित झाल्याने परिसरात चिंतेचे वातवरण निर्माण झाले आहे. सदर दोन करोनाबाधित रुग्णांवर नाशिक येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. मात्र या करोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या 21 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने निमोणच्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता निमोणची कोरोनाबधितांची संख्या चारवर जाऊन पोहचली आहे.