पुणे – शहराच्या भूगर्भात टाकण्यात आलेल्या महापालिकेच्या सर्व सेवा वाहिन्यांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी, राज्यशासनाकडून “कॉल बी फोर यू डिग’ या नावाचे मोबाइल ऍप विकसित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत सर्व शासकीय तसेच खासगी मोबाइल कंपन्यांनी टाकलेल्या केबल, महावितरणच्या भूमिगत केबल यांचे मॅपिंग केले जाणार आहे. त्याचे नकाशे आणि माहिती या ऍपवर उपलब्ध असेल.
शहराच्या भूगर्भात नेमक्या कोणत्या आणि किती सेवा वाहिन्या आहेत, याची माहिती खासगी सेवा वाहिन्या टाकणाऱ्या कंपन्या, महापालिका, राज्यशासन तसेच नागारिकांनाही पाहता येणार आहे. या ऍपमध्ये या सेवा वाहिन्यांची माहिती “अपलोड’ करण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांना राज्यशासन प्रशिक्षणही देणार आहेत. या ऍपमुळे महापालिका, महावितरण, एमएनजीएलसह खासगी मोबाइल कंपन्यांनी नेमक्या किती सेवा वाहिन्या शहराच्या पोटात टाकण्यात आल्या आहेत, याची माहिती संकलित होणार आहे. शिवाय सेवावाहिनीचा प्रकार, तिचे स्वरूप, अंतर, ती किती खोलवर आहे अशी माहितीही नकाशासह असणार आहे. सेवा वाहिन्यांची माहिती संकलनासाठी पाणीपुरवठा, पथ, ड्रेनेज विभाग तसेच खोदाईबाबत इतर विभागांत प्रत्येकी एक समन्वय अधिकारी पालिका नेमणार आहे. त्याबाबत शासनाकडून बैठकही घेण्यात आली असून, महापालिकेस हे कामही सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यंत्रणा आणि सेवावाहिन्या
महापालिका : पाणीपुरवठा, ड्रेनेज तसेच पावसाळी वाहिन्या
महावितरण : भूमिगत वीजवाहिन्या
“एनएनजीएल’ : भूमिगत गॅसवाहिन्या
खासगी मोबाइल कंपन्या : ऑप्टिकल फायबर केबल
खोदाई परवानगीही ऑनलाइन
यापुढे शहरात खोदाई परवानगी अर्ज या ऍपद्वारेच स्वीकारले जाऊन त्याला मनपाची परवानगीही ऍपद्वारेच मिळेल. त्यामुळे भविष्यात टाकण्यात येणाऱ्या वाहिन्यांची माहितीही आपोआप संकलित होणार आहे. परवानगी देण्यायापूर्वी संबंधित ठिकाणच्या सेवावाहिन्या, नव्याने वाहिनी टाकणे शक्य आहे का, अशी माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.