चेन्नई – भारताचा युवा ग्रॅंडमास्टर बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंद याने एअरथिंग्ज मास्टर्स ऑनलाइन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या 8 व्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनवर सनसनाटी विजयाची नोंद केली. त्याने काळ्या सोंगट्यांनी खेळताना केवळ 39 चालीतच कार्लसनला सलग तिसऱ्या विजयापासून वंचित ठेवले.
प्रज्ञानंदने आठव्या फेरीअखेर आठ गुणांसह 12 व्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याने पहिल्या राऊंडमध्ये मॉडरेट रननंतर कार्लसनवर विजय मिळवला. याचबरोबर त्याने लेव्ह ऍरोनियनवरही मात केली. त्याने अनिश गिरी आणि क्युआंग लिएम याच्याविरुद्धचे सामने अनिर्णितही राखले व आपले वर्चस्व सिद्ध केले. तर एरिक हानसेन, डिंग लिरेन, जॅन क्रयझस्टॉफ दुदा आणि मॅमेद्यारोव्ह यांच्याविरुद्धचे सामने गमावले.
एअरथिंग्ज मास्टर्स स्पर्धेत 16 खेळाडू ऑनलाइन रॅपिड स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पहिल्या फेरीत खेळाडूंना एका विजयासाठी 3 गुण तर अनिर्णित सामन्यासाठी 1 गुण मिळतो. पहिल्या फेरीतील अजून सात फेऱ्या बाकी आहेत.