मुंबई -जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी आयसीसीने ड्युक्स चेंडू वापरण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यावर भारतीय संघाने नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता हे चेंडू आयपीएल स्पर्धेदरम्यानच बीसीसीआय कसोटी संघातील खेळाडूंसाठी उपलब्ध करून देणार असून, त्यावरच संघाचा सराव होणार आहे.
भारतीय संघासाठी गेल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीतही हेच ड्युक्सचे चेंडू मारक ठरले होते. हे चेंडू एसजी टेस्ट किंवा कुकाबुरा चेंडूंपेक्षाही जास्त स्विंग होतात. गेल्या वर्षीच्या स्पर्धेत भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये खेळताना प्रत्येक देशाच्या संघाला याच चेंडूंवर खेळावे लागते. कारण इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यांसाठी हेच चेंडू वापरले जातात.
मात्र, ऍशेस कसोटीमुळे व द्विपक्षीय कसोटी मालिकेमुळे ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडला या चेंडूंवर खेळण्याचा सराव भारतीय संघापेक्षा जास्त आहे. त्यामुळेच भारतीय संघाने म्हणजेच बीसीसीआयने या चेंडूंच्या वापरावर नाराजी व्यक्त केली होती.
आता मात्र, एक पाऊल मागे घेत बीसीसीआयने आपल्या खेळाडूंसाठी हे चेंडू उपलब्ध करून दिले असून, या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडू नेटमध्ये याच चेंडूंवर सराव करणार आहेत.