जळगाव – राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व कुटुंबियांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी त्यांना तब्बल 137 कोटी 14 लाख 81 हजार 883 रुपये दंड आकारण्यात आला असून, त्यासंदर्भात मुक्ताईनगर येथील तहसीलदारांनी नोटीसही बजावली आहे.
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात मुरूम उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी, खडसे परिवाराच्या नावाने सातोड शिवारात 33 हेक्टर 41 आर जमिनीची खरेदी करण्यात आली असून, तेथून राष्ट्रीय महामार्गासाठी 400 कोटींचे गौण खनिजाचे उत्खनन करीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.
त्याअनुषंगाने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चौकशीची ग्वाही दिल्यानंतर राज्य शासनाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. या पथकाने चौकशी करीत अहवाल राज्य शासनाला सादर केल्यानंतर दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
या नोटिशीत सातोड शिवारातील खुल्या भूखंडातून अवैधरीत्या मुरुमाचे उत्खनन व वाहतूक केल्याचे नमूद करीत अवैधरीत्या उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे मूल्य 26 कोटी एक लाख 12 हजार 117 इतके दाखविण्यात आले असून, नियमानुसार त्याच्या पाचपट दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
आमदार खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ही जमीन असल्याने तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. आमदार खडसे यांच्या स्नुषा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचाही त्यात समावेश आहे.