नगर – नगरच्या पाणीपट्टीत दुप्पटीने वाढ करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव आज स्थायी समितीने फेटाळून लावला. मात्र दहा टक्के वाढीस मान्यता देण्यात आल्याने आता नगरकरांच्या माथी दहा टक्के पाणीपट्टीची वाढीचा ओझा पडणार आहे.
स्थायी समितीने दहा टक्के वाढीचा शिफारस आता महासभेकडे केली आहे. त्यामुळे यावर महासभा काय निर्णय घेणार याकडे आता नगरकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, फेज टु पाणी योजनेची कामे अपूर्ण असून पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला होत असल्याचा आरोप करून पाणीपुरवठा विभागाला सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले.
घरगुती पाणीपट्टीत दुपटीने वाढ करण्याच्या या प्रस्तावावर आज स्थायी समितीत चर्चा झाली. अर्धा इंचसाठी दीड हजार रुपयांऐवजी तीन हजार, पाऊण इंचासाठी तीन हजाराऐवजी सहा हजार तर एक इंचासाठी दहा हजार रुपयांचा पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव होता. त्यावर स्थायी समितीने निर्णय घेत दहा टक्क्याची वाढ सुचवली. यावेळी स्थायी समितीच्या सभेला सभापती मुदस्सर शेख, नगरसेवक सुभाष लोंढे, गणेश भोसले, आशा कराळे, सोनाली चितळे, सुवर्णा जाधव, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगरसचिव एस.बी. तडवी, पाणी पुरवठा विभाग प्रमुख महादेव काकडे, यंत्र अभियंता परिमल निकम आदी उपस्थित होते.
पाणीपट्टी वाढीचा विषय पटलावर येताच आशा कराळे यांनी जोरदार विरोध केला. शहरात काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त दाबाने पाणी पुरवठा होतो. असे असताना दरवाढ कशी करायची असा प्रश्न कराळे यांनी उपस्थित केला. याला गणेश भोसले व सुभाष लोंढे यांनी समर्थन दिले. शहरात काही ठिकाणी पाच ते सहा दिवसांनी पाणीपुरवठा होतो. अशा ठिकाणी वाढीव कर आकारणी कशी करणार असा प्रश्न लोंढे यांनी मांडला.
पाणी पुरवठा विभागप्रमुख काकडे म्हणाले, दर वर्षी लघुपाटबंधारे व जीवन प्राधिकारणाचे दर वाढत आहेत. 2003 सालनंतर घरगुती पाणीपट्टीचे दर वाढ झालेली नाही. त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च वाढला आहे. यावर भोसले यांनी पाणीपट्टी वाढ करायलाच हवी पण आधी फेज 2 चे काम पूर्ण करा. सर्वांना समान व पुरेसे पाणी मिळू द्या मग दरवाढ करा,” असे सांगितले.
यावेळी उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असले तर करवाढ करून काही मोठे साध्य होणार नाही. त्यापेक्षा खर्चात काटकसर करा. महापालिकेच्या कलम 127 ब नुसार वाहन कराच्या रुपात महापालिकेला उत्पन्न मिळू शकते. शहरात पाणी पुरवठा योग्य नाही व फेज 2 चे कामही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पाणीपट्टीत सध्या 10 टक्के कर व फेस 2 चे काम पूर्ण झाल्यानंतर 100 टक्के कर वाढीचा प्रस्ताव टाकल्यास त्याला मंजुरी देण्यात येईल असे स्थायी समितीचे सभापती मुद्दसर शेख यांनी सागितले.
महापालिकेच्या मालमत्तेवरील भाड्याचे नुतनीकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी आदी सदस्य असलेली समिती 13 सप्टेंबर 2019 ला गठीत करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. महापालिकेच्या मालमत्तेवरील भाडे दुप्पट करण्याचा प्रस्ताव मार्केट विभागाने मांडला होता. हा प्रस्ताव आज स्थायी समितीसमोर ऐनवेळी ठेवण्यात आला. स्थायी समितीने यातील रस्ता बाजू फी 10 रुपायाहून 20 रुपये, स्लॉटर फी 5 हुन 10 रुपये व रात्रीची रस्ता बाजू 5 हुन 10 फी करण्याला मान्यतादेत प्रस्ताव महासभेकडे पाठविला. तसेच महावीर वाचनालयातील सभासद फी 10 रुपयांवरून 50 रुपये करण्याला मान्यता देण्यात आली.
सभेच्या सुरवातीलाच गणेश भोसले यांनी बाळासाहेब देशपांड रुग्णालयातील रक्त तपासणी संदर्भातील मशिनची दुरवस्ता झाली आहे. अनेक वर्षे ही रक्तपेढी व्यवस्थित सुरू होती. आता का सुरू नाही? कर्मचाऱ्यांना फुकट पोसायचे का? असा सवाल करताच आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनाही समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे हा विषय पुढील स्थायी समितीच्या सभेत घेण्याची सूचना केली, याला सभापती शेख यांनी मान्यता दिली.
तसेच भाजी मार्केट, गाळे, मोकळ्या जागा, शाळाखोल्यांची भाडे ठरविण्यासाठी शासनाने जिल्हाधिकारी, आयुक्त व जिल्हा निबंधक मुद्रांक यांची समिती गठीत करण्याचा आदेश दिली आहे. या समितीने घेतलेल्या निर्णयावर मनपाला अंमलबजावणी करावी लागणार आहे. शासनाच्या या निर्णयाने भाडे ठरविण्याचा मनपाचा अधिकार एकप्रकारे कमी झाला आहे. यासंदर्भातील भाडेवाढीचा प्रस्ताव मार्केट विभागाने स्थायी समोर आज ठेवला होता. मात्र त्यावर कोणताच निर्णय झाला नाही.
10 टक्के कर वाढीने 81 लाख रुपये मिळणार
शहरात सध्या 54 हजार नळ कनेक्शन असून महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे बजेट 32 कोटी असून 12 कोटी उत्पन्न तर 21 कोटी खर्च होत आहे. त्यामुळे उत्पन्ना पेक्षा जास्त खर्च होत असून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्थायी समोर कर वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यावर स्थायीने 10 टक्के पाणीपट्टीत वाढ केली असून महापालिकेला अंदाजे कोटभर रुपये मिळणार आहे.