महाराष्ट्रातील सत्तेसाठी प्रमुख महापालिका ताब्यात घेण्याची तयारी
पुणे – विधानसभा निवडणुकीत पाचपैकी चार राज्यांत भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहिले असले तरी पंजाबमध्ये भाजप आणि कॉंग्रेसला मागे टाकत आम आदमी पार्टीने (आप) बहुमत मिळवत लोकशाहीची ताकद दाखवून दिली. पंजाबमध्ये मिळालेल्या यशामुळे “आप’ने मोठी राजकीय उसळी घेतली आहे. आपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वासही या विजयामुळे वाढला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये “आप’ सर्वच पक्षांना आव्हान देऊ शकतो. अगदी पुणे महापालिकेतही आप राजकीय गणिते बदलण्याची ताकद ठेवून आहे.
दिल्लीनंतर पंजाबमध्ये निर्विवाद यश मिळाल्याने 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची सत्ता काबीज करण्यासाठी आम आदमी पार्टीकडून आता स्थानिक स्वराज संस्थावरही लक्ष केंद्रित करण्याच्या हालचाली सुरू होतील. यातूनच मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या सारख्या मोठ्या महापालिका निवडणुका “आप’ लढवू शकतो. नोव्हेंबर, डिसेंबर 2021 मध्ये आपचे आपचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांच्यासह पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरांचा दौरा करीत राजकीय स्थिती जाणून घेतली होती. त्याचवेळी दिल्लीत आपची सत्ता आहे.
पंजाबामध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आप आहे, (आता सत्ता मिळाली) तर मग महाराष्ट्रातही आपला पक्ष यश मिळू शकतो. याकरीता सर्व महानगरपालिका निवडणुका लढविण्याबाबतचा अहवाल पक्षाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्रात सर्व महापालिका निवडणुका लढविण्याचा निर्णय आप पक्षाच्या बैठकीत यापूर्वीच घेण्यात आलेला आहे. त्यामुळे सप्टेंबर 2022मध्ये होणाऱ्या पुणे आणि महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीकडून उमेदवार रिंगणात उतरू शकतील.
…तर चित्र पलटू शकते
दिल्लीत आणि पंजाबमध्ये घडू शकते तर महाराष्ट्रात का नाही? असे येथील जनतेला वाटू शकते. सत्ता स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी आहे, हा “आप’चा विचार आहे व तो सामान्य नागरिकांनाही विचार करण्यास भाग पडतो. सध्या, महाराष्ट्र राज्यात गेल्या काही महिन्यांत सत्ताधारी आणि विरोधकांत भ्रष्टाचारासह अन्य मुद्द्यांवरही अगदी खालच्या दर्जाचे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या सगळ्याला महाराष्ट्रातील जनता कंटाळली आहे. याचेच पडसाद मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड सारख्या शहरांतही उमटू शकतात.