पुणे – मित्राशी झालेल्या भांडणाच्या कारणावरून कोयत्याने डोके, खांदा आणि चेहऱ्यावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पाच वर्षे पंधरा दिवस सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एच.ग्वालानी यांनी सुनावली.
दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे. मोहन ऊर्फ बाबु जनार्दन मुजुमले (वय 26, रा. वाकड, मूळ. बोरवटी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात आणखी एकावर गुन्हा दाखल होता. सुनावणी दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत प्रकाश लक्ष्मण पारखे (वय 38, रा. माळवाडी-पुनावळे, ता. मुळशी) असे घटनेत जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांचा मामा पांडुरंग खंडू दर्शले (वय 60 ) यांनी याबाबत हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी 8 साक्षीदार तपासले. जखमी पारखे आणि फिर्यादींची साक्ष यामध्ये महत्त्वाची ठरली. हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दीपक गायकावड यांनी सरकारी पक्षाला सहाय केले.
ही घटना माळवाडी-पुनावळे येथील एका हॉटेलसमोर 5 ऑगस्ट 2014 रोजी दुपारी 4.30 च्या सुमारास घडली. प्रकाश याची या गुन्ह्यात आरोपी असताना मयत झालेल्या व्यक्तीच्या मित्राबरोबर भांडण झाले होते. याच कारणावरून मयत आणि त्याचा मित्र मुजुमले या दोघांनी प्रकाश यांना जखमी केले. भाच्याला वाचविण्यासाठी फिर्यादी मामा मध्ये पडले असता त्यांच्यावर पिस्तुल रोखल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर युक्तीवाद करताना, आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी ऍड. विलास घोगरे पाटील यांनी केले.