इस्लामाबाद – आपल्याला धमकावणाऱ्या अमेरिकन अधिकाऱ्याचे नाव आज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, दक्षिण आणि मध्य आशियाई विभागासाठी काम करणारे अमेरिकेचे सहाय्यक परराष्ट्र सचिव डोनाल्ड लू यांनी पाकिस्तानचे राजदूत असद मजीद यांच्यामार्फत आपल्या सरकारला धमकीचा संदेश पाठवला होता.
डॉनने इम्रान खानच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेने पाकिस्तानच्या दूताद्वारे धमकीचा संदेश पाठवला होता.
ते म्हणाले की डोनाल्ड लू यांनी राजदूत असद मजीद यांच्याशी झालेल्या बैठकीत असा इशारा दिला होता की जर विद्ममान सरकार नॅशनल असेंब्लीमध्ये विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावात टिकून राहिले तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.
डॉनच्या वृत्तानुसार, पंतप्रधानांनी सांगितले की, पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या असंतुष्टांनी अमेरिकेच्या दूतावासात वारंवार भेटी दिल्याचीही माहिती आपल्याकडे आहे. ते म्हणाले, आम्हाला सोडून गेलेले लोक गेल्या काही दिवसांत अमेरिकन दूतावासातील लोकांना वारंवार भेटायचे कारण काय होते?”
गेल्या आठवड्यात राष्ट्राला संबोधित करताना, इम्रान खान यांनी त्यांच्या सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करणाऱ्या विरोधकांच्या वाढत्या आत्मविश्वासाचा दाखला देऊन हे विदेशी षड्यंत्र असल्याचा आरोप केला होता. पाकिस्तान सारख्या सार्वभौम राष्ट्रांत अमेरिकेने केलेला हा अवाजवी हस्तक्षेप आहे. त्यासाठी त्यांनी विरोधी सदस्यांनीही साथ दिली असा आरोपही त्यांनी केला.