अकोले – राजूर पोलिसांनी माणिक ओझर येथे अवैध दारू साठा जप्त केला आहे. अवैध दारू विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या छुप्या मार्गाने अवैध दारू विक्री करणारी टोळी राजूर पोलिसांच्या रडारवर असून ही कारवाई त्याचाच एक भाग होता.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, माणिक ओझर येथील बालवाडी शेजारील बंद असलेल्या घरामध्ये अवैध दारू विक्री होत असल्याची खबर राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळताच त्यांनी तातडीने आपले सहकारी पोलीस कॉन्स्टेबल मनोहर मोरे व होमगार्ड सोनवणे यांना घटनास्थळी पाठवले. दारूची विक्री होत असलेल्या ठिकाणी त्यांनी छापा टाकला. अवैध देशी दारूचा साठा हस्तगत केला. संबधित इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.