मुंबई – छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेत्री वनिता खरात घराघरात पोहचली. उत्तम आणि अचूक विनोदी शैलीने तिने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. तिच्या बेधडक वक्तव्यामुळे देखील ती चर्चेत राहिली आहे. अनेकदा तिला लठ्ठपणामुळे हिणवले जाते. मात्र त्याला ती सडेतोड उत्तर देते. अशात वनिताची सोशल मीडियावरील पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमसोबत अमेरिका दौऱ्यावर असतानाच वनिता खरातचा वाढदिवस होता. मोठ्या थाटात टीममधील सदस्यांनी तिचा वाढदिवस अमेरिकेत साजरा केला. हास्यजत्रेची टीम अमेरिका दौरा करुन पुन्हा भारतात परतली आहे. वनिता खरातने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधल आहे.
वनिताने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की,’या वर्षीचा माझा वाढदिवस खूप विशेष होता,कारण दीड दिवस माझा वाढदिवस साजरा झाला तोही ३ देशांमध्ये अमेरिका , कॅनडा आणि भारत… तोही माझ्या लाडक्या माणसांबरोबर! इतक्या जल्लोषात आणि उत्साहात, इतक्या वेगवेगळ्या गोष्टी बघत माझा वाढदिवस साजरा होईल असं खरंच वाटलं नव्हतं. प्रेक्षकांच्या प्रेमाची ताकद मला आज इथवर घेऊन आली, आणि माझ्या मित्रांनी या वाटेवर माझी सोबत केली या वाढदिवसानिमित्त स्वतःसाठी काही गोष्टी ठरवल्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. मिळणार प्रेम द्विगुणित करण्याचा प्रयत्न करेन. जितकं हसवते आहे तितकाच मीही हसत राहण्याचा प्रयत्न करेन, सोबत तुम्ही असालच ही आशा बाळगून…’ या पोस्टमध्ये तिने अमेरिकेतील अनुभव आणि वाढदिवसाबाबत आपला अनुभव शेअर केला आहे.