नवी दिल्ली – शेतकऱ्यांच्या मुझफ्फरनगरमध्ये रविवारी होणाऱ्या महापंचायतीमध्ये किती जण सहभागी होतील, हे आताच सांगणे शक्य नाही. मात्र, नक्की मोठी गर्दी होईल. शेतकऱ्यांना महापंचायतीपर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कोणीही जर आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना फोडून काढू आणि महापंचायतीत पोहोचू, असे आव्हानच शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिले.
केंद्राच्या तीन शेती कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाने रविवारी उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये महापंचायतीचे आयोजन केले आहे. टिकैत यांनी सांगितले की, पंजाबमधून सुमारे दोन हजार शेतकरी मुझफ्फरनगरला पोहोचण्याची शक्यता आहे. ते अमृतसरहून पहाटे 4 वाजता, जालंधरमधून सकाळी 5 वाजता आणि लुधियानाहून सकाळी 6 वाजता रेल्वेने रवाना होतील.
दिल्ली सीमेवरील आंदोलनस्थळावरून 400 ते 500 शेतकरी महापंचायतीत सहभअगी होतील. टिकरी आणि गाजीपूर सीमेवरून ते बसने निघत आहेत. शुक्रवारी रात्री दोन बस मुझफ्फरनगरसाठी रवाना झाल्या, आज शनिवारी सकाळी आणखी दोन बस गेल्या असून इतर बस रात्री शेतकऱ्यांना घेऊन निघतील. महापंचायतीसाठी गावांमधून मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत, असेही राकेश टिकैत यांनी सांगितले.
हरियाणा, महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांतील शेतकरीही महापंचायतील मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना मुजफ्फरनगरला नेण्यासाठी 500 बसेस भाड्याने घेण्यात आल्या आहेत.
महापंचायत सुरळीतरित्या पार पडावी, याची जबाबदारी 5 हजार स्वयंसेवकांना देण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना मैदानापर्यंत पोहोचण्यासाठी ओळखपत्र देण्यात येणार आहे. शिवाय काही अडचण आल्यास सर्व स्वयंसेवकांन आपत्कालीन क्रमांक देण्यात आला आहे.
महापंचायतीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पंचायतीच्या मुख्य व्यासपीठापर्यंत कोण-कोण पोहोचू शकतंय, हे पहावं लागेल. तसेच गर्दीमुळे जे पोहोचू शकत नाहीत, त्यांच्यासाठी मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती टिकैत यांनी दिली.
उत्तर प्रदेशच्या निवडणुका आणि महापंचायत
ही महापंचायत केवळ निवडणुकीशी जोडलेली नाहीए. युपीमध्ये सहा महिन्यांनी निवडणुका होणार आहेत. तिथले शेतकरी अडचणीत आहेत. यूपीमध्ये विजेचे दरही सर्वाधिक आहेत. 2016 पासून उसाच्या दरात वाढ झालेली नाही. केवळ पाच रुपये, पाच पैसे प्रति किलोने दरात वाढ करून तुम्ही शेतकऱ्यांचा अपमान करताय का? असा सवालही राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला केला.