त्यांनी काम केले, तर त्याचा हिशेब जनतेला द्यावा

पालकमंत्री राम शिंदे यांनी रोहित पवार यांना लगावला टोला, विविध कामांचे केले उद्‌घाटन

जामखेड – मतदारसंघात दहा वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून साल घातले. साल घालताना पाच वर्षांच्या मंत्रिपदाच्या काळात प्रत्येक गावात विकासकामांसाठी निधी दिला. केलेल्या कामांचा प्रत्येक गावात फलक लावून हिशोब दिला. आता ज्यांना उभे राहायचे, त्यांनी काम केले असेल, तर त्याचा हिशोब त्यांनी द्यावा. त्यांनी केवळ दारू मटणावर जोर दिला आहे. तसे मला ही करता आले असते. पण मी विकासाचा दृष्टिकोन पाहिला, असा टोला पालकमंत्री राम शिंदे यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला.

सावरगाव येथे घाटमाथ्यावर वृक्षारोपण, नळ पाणीपुरवठा योजना व विहिरीचे भूमिपूजन व जलशुद्धीकरण यंत्रणेच्या उद्‌घाटन प्रसंगी पालकमंत्री राम शिंदे बोलत होते. सरपंच काकासाहेब चव्हाण, उपसरपंच वसंत कदम, सेवा संस्थेचे अध्यक्ष दादाहरी ढवळे, विठ्ठलराव चव्हाण, महादेव फाळके, शेषेराव चव्हाण, इंद्रजित चव्हाण, बाबासाहेब गोरे, आश्रू चव्हाण, अतुल सपकाळ, आसाराम ढवळे, ग्रामपरिवर्तक शिवाजी माने, ग्रामविकास अधिकारी अभिजित लव्हळे, रवी सपकाळ, पंचायत समिती सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती सूर्यकांत मोरे, भाजप तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, तुषार पवार, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, भाजप जिल्हा सरचिटणीस आजीनाथ हजारे, जि. प. सोमनाथ पाचरणे, अनिल लोखंडे, नगराध्यक्ष निखिल घायतडक, सरचिटणीस प्रवीण चोरडिया, अलताफ शेख, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रवीण सानप, शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात, संचालक पोपट राळेभात उपस्थित होते.

ना. शिंदे म्हणाले, जिल्ह्यात कोणत्याच तालुक्‍याला मिळाला नाही इतका निधी कर्जत-जामखेड तालुक्‍यांत या पाच वर्षांत आणला. त्यामुळे प्रत्येक गावात व खेड्यात किती निधी दिला, कोणाला कशाचे अनुदान मिळाले, कांदा चाळ, सभामंडप, रस्ते, ट्रॅक्‍टर वाटप याचे फलक लावण्यात येत आहेत. मी खिशातून पैस घालीत नाही. तो मंत्रिपदाचा वापर करून आणला, असेही ते म्हणाले.
पाच वर्षांच्या मंत्रिपदाच्या काळात 12 खाते सांभाळली आहेत. त्यामुळे जो माहिती नाही तो निधी मिळवून दिला आहे. जर एखाद्याने काम न केल्याचे सिद्ध करून दाखवले, तर निवडणुकीत उभा राहणार नाही, असे आव्हान विरोधकांना देऊन पालकमंत्री शिंदे म्हणाले, या मतदारसंघात जलसंधारण खात्यामार्फत मोठ्या प्रमाणावर निधी दिला व कामे झाली आहे.

पण दुर्दैवाने पाऊस पडेना. नाही तर कोकणासारखी हिरवीगार परिस्थिती व पावसाचे पाणी दिसले असते. त्यामुळे ग्रामस्थांनी आता कोणाच्या भूलथापांना भुरळून न जाता आपला कोण आहे कोण नाही, याचा विचार करून भाजप सेना या महायुतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले.

ना. शिंदे यांनी सावरगाव येथील छावणीला भेट देऊन जनावरांना चारा दिला तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून अडीअडचणींची माहिती घेतली. यावेळी कसबा गणपती ट्रस्टच्या वतीने तेजस पाठक, प्रसाद नवले, सुनील मालुसरे, मंगेश पाकरखेड यांचा सत्कार केला. प्रास्ताविक सरपंच काकासाहेब चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन विठ्ठलराव चव्हाण यांनी, तर आभार ग्रामविकास अधिकारी अभिजित लव्हळे यांनी मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.