मुंबई – राम मंदिराच्या आंदोलनात मी आणि जयश्री पाटील दोघेही होतो. त्यामुळे या सोहळ्याचे निमंत्रण मलाही आले आहे. परंतु जरांगे पाटील मुंबईत येणार आहेत, त्या संदर्भात उद्या उच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यामुळे मला अयोध्येला जाता येणार नाही, अशी प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते यांनी दिली.
अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना होत आहे. पण हे होऊ नये, सुट्टी मिळू नये यासाठी कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये काही आक्षेपार्ह नव्हते. राम मंदिर प्रकरणात मी आणि जयश्री पाटील देखील होतो. कारसेवकांची बाजू त्यांनी घेतली होती. त्यामुळे आम्ही त्यांची बाजू घेतली आणि कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली. जी सुट्टी जाहीर केली, त्याला कोणतीही स्थगिती दिली नाही. रामलल्लाच्या पूजेसाठी सर्वांना सुट्टी जाहीर केली. त्यावर शिक्कामोर्तब झाले, असे सदावर्ते म्हणाले.
यांची असणार प्राणप्रतिष्ठेला उपस्थिती
सोमवारी होणाऱ्या सोहळ्यासाठी रजनीकांत, चिरंजीवी, मोहनलाल, प्रभास, अल्लू अर्जुन, ज्युनियर एनटीआर या दाक्षिणात्य सुपरस्टार्सप्रमाणेच बॉलीवूडमधील अक्षयकुमार, अनुपम खेर, अजय देवगण, माधुरी दीक्षित, कंगणा राणावत आदी आघाडीच्या कलाकारांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तशा चित्रपट ताऱ्यांमध्ये भाजपचे खासदार असणाऱ्या हेमा मालिनी आणि सनी देओल यांचाही समावेश आहे. कपिल देव, सुनील गावसकर, सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा या आजी-माजी क्रिकेटपटूंबरोबरच विश्वनाथन आनंद, पी.टी.उषा, बायचुंग भुतिया हे क्रीडा क्षेत्रातील दिग्गजही निमंत्रित आहेत.
विशेष निमंत्रण असणाऱ्या उद्योगपतींमध्ये रतन टाटा, आनंद महिंद्रा, एन.आर.नारायण मुर्ती, अझिम प्रेमजी आणि इतरांचा समावेश आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड हेही विशेष निमंत्रित आहेत. इतर नामवंतांमध्ये इस्त्रोचे प्रमुख एस.सोमनाथ, दिल्ली मेट्रोचे प्रधान सल्लागार ई.श्रीधरन, वरिष्ठ वकील हरीष साळवे आदींचा समावेश आहे.
विशेष यादीत आडवाणी आणि जोशीही
विशेष निमंत्रितांच्या विशेष यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी यांचाही समावेश आहे. भाजपच्या फायरब्रँड नेत्या उमा भारती हेही विशेष निमंत्रित आहेत.