मधुबनी – बिहारच्या मधुबनी मधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पती-पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे महिला 8 महिन्याची गर्भवती होती. वर्षभरापुर्वीच दोघांचे लग्न झाले होते. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोघांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही. आपसातील वादातून दोघांनी हे पाऊल उचलले असल्याचे कुटुंबीयांचे मत आहे.
राजू प्रसाद यादव (वय 22 वर्षे) व राणी यादेव (20 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीचे नाव आहे. ही घटना घडली त्यावेळी घरात पती-पत्नीशिवाय दुसरे कोणी नव्हते. मुलाचे पालक त्याच गावात त्यांच्या दुसऱ्या घरी होते. दरम्यान राजूची आई घरी परत आली तेव्हा घरात कमालीची शांतता दिसून आली. राजू व राणी या दोघांनाही हाक मारली मात्र घरातून कोणताही प्रतिसाद आला नाही व दारही उघडले नाही. राजूच्या आईला संशय आल्यावर ती जोरजोरात ओरडू लागली. यानंतर मुलाचे वडीलही धावत पोहोचले व त्यांनी दार उघडले तेव्हा छतावर साडीला फास लावून मुलगा एका बाजूला आणि सून दुसऱ्या बाजूला लटकत होती.