मुंबई – अभिनेत्री आणि सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर कुशा कपिलाने जोरावर अहलूवालिया याच्यासोबत लग्न केले होते. मात्र लग्नाच्या सहा वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाआधी ते अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. मात्र त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहतेही चकित झाले आहेत. कुशा व जोरावर दोघांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर कुशाला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यास सुरूवात झाली. मात्र यावर आता कुशाने संताप व्यक्त केला आहे.
कुशाने घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर तिचा व करण जोहरचा गप्पा मारतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये करण जोहर मजेत म्हणतो की, “मी रिलेशनशिपबाबत सल्ला देण्यात खूप चांगला आहे. रिलेशनबाबत पहिला सल्ला मी ब्रेकअपचा देतो आणि लैंगिक व्यभिचार हा विश्वासघात नाही, हे लक्षात ठेव.” कुशाने करणच्या बोलण्याचा सहमती दर्शवली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कुशाला ट्रोल केलं गेलं.
यावर “ही घटस्फोट घेणार असल्याची पहिली हिंट तेव्हाच मिळाली होती, जेव्हा कुशाने करण जोहरने दिलेल्या सल्लावर सहमती दर्शवली होती.” “लैंगिक व्यभिचार याच शब्दात विश्वासघात आहे,” अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी कुशाला ट्रोल केलं होतं. त्यावर आता तिचा जोरावरने प्रतिक्रिया दिली आहे.
जोरावरने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, ‘आम्ही सार्वजनिक जीवन जगतो हे आम्हाला समजते, पण तरीही आम्ही काही गोष्टी पवित्र मानतो. आमचा विवाह आणि एकमेकांबद्दलचा आदर हा त्यापैकीच एक. आमच्या लग्नाप्रमाणेच घटस्फोट हा देखील आम्ही दोघांनी मिळून घेतलेला निर्णय होता. खूप विचार आणि विचार केल्यावर. हा एक कठीण आणि वेदनादायक निर्णय होता, पण आम्हा दोघांच्या भल्यासाठी आम्ही एकत्र हा निर्णय घेतला आहे.’
पुढे त्याने लिहिले की, ‘गेल्या २४ तासांत कुशाला ऑनलाइन खूप ट्रोल केले गेले. लोकांच्या अशा प्रतिक्रियांनी मला दुःख होते आणि मी अत्यंत निराश झालो आहे. कुशाच्या चारित्र्याबद्दल बोलून तिला खलनायक म्हणून दाखवणे लज्जास्पद आहे.’ दरम्यान, कुशा आणि जोरावर अहलुवालिया यांनी त्यांच्या घटस्फोटामागील कारण अद्याप उघड केलेले नाही.