पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासह पुणे व जिल्ह्यात तब्बल 87 घरफोड्या करणारा आरोपी व त्याचा एक साथीदार भोसरी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्याकडे चौकशी करून पोलिसांनी मागील वर्षातील घरफोडी आणि वाहन चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत.
जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय 32, रा. औंध) असे कुख्यात चोराचे नाव आहे. त्याच्यासह त्याचा साथीदार सचिन धनराज पवार (वय 28, रा. आदर्शनगर, मोशी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
भोसरी पोलिसांनी दोन्ही आरोपींची माहिती काढून त्यांना अटक केले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी भोसरी परिसरात चार घरफोड्या आणि एक वाहन चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून सहा लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे भोसरी पोलीस ठाण्यातील घरफोडीचे चार आणि वाहन चोरीचा एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपी जयड्या हा सराईत चोर आहे. एखाद्या ठिकाणी घरफोडी करत असताना त्याचा गुन्हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे त्याच्या निदर्शनास आल्यास तो तात्काळ स्थानिक पोलिसांसमोर हजर होत असे. त्याने आतापर्यंत पुणे, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड शहरात 87 गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे.