हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ या दोघांही ऍक्शन हिरोंचा “वॉर’ ची त्यांचे चाहते खूप आतुरतेने वाट पहात आहेत. “वॉर’च्या ट्रेलरमध्ये या दोघाही ऍक्टर्सनी दाखवलेल्या ऍक्शन स्कीलमुळे हे आकर्षण अधिकच वाढले आहे. याच सिनेमात टायगर आणि हृतिकमधील पाठलाग आणि ऍक्शनच्या एका सिक्वेन्ससाठीचे शुटिंग तब्बल 7 देश आणि 15 शहरांमध्ये झाले आहे. ही हाणामारी एकाच वेळी 7 देशात कशी झालेली दाखवली असेल, अशीही उत्सुकता आता निर्माण झाली आहे.
यातल्याच एका सिक्वेन्सचे शुटिंग ऑस्ट्रेलियातल्या बोंडी बीचवर झाले. डायरेक्टर सिद्धार्थ आनंदनी या ऍक्शन सिक्वेन्सबाबतचा तपशील ट्विटरवर शेअर केला आहे. बोंडी बीचवरचे निसर्ग सौंदर्य पाहून आपण भारावून गेलो आणि तेथेच शुटिंग करण्याचा निर्णय घेतला, असे सिद्धार्थ आनंदनी सांगितले.
या ऍक्शन सिक्वेन्सबाबत अधिक माहिती द्यायची म्हणजे प्रेक्षकांच्या उत्सुकतेला संपवल्यासारखे होईल, त्यामुळे अधिक काहीही सांगण्यास त्यांनी नकार दिला. यशराज बॅनर खाली तयार झालेल्या या सिनेमामध्ये हृतिक रोशनची हिरोईन म्हणून वाणी कपूर दिसणार आहे. “वॉर’ एकाच वेळी हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये 2 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.