भारतातील बहुसंख्य व्यक्ती पासवर्ड ठेवताना Password असाच ठेवतात. डिजिटल विश्वात कुठेही नवीन खाते उघडायचे असेल, व्यवहार सुरु करायचे असतील, बिले भरायची असतील तर त्या साईटवर किंवा अॅपवर आधी खाते सुरु करावे लागते.
त्या खात्यासाठी पासवर्ड सेट करावा लागतो. त्यावेळी set a password अशी सूचना मोबाईलवर किंवा संगणकावर येते आणि मग बहुतेक जण ती सूचना जशीच्या तशी स्वीकारून password हाच पासवर्ड ठेवतात. भारताबरोबरच जपानमधील नागरिकांनाही अशीच सवय आहे. त्यामुळेच जपानमधील अनेक लोकांचा पासवर्ड हा password असा असतो. जगातील अनेक देशांचा विचार केला तर बहुसंख्य लोकांचा पासवर्ड हा हाच असतो, असे नॉर्डपास या पासवर्ड मॅनेजर संस्थेने केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे.
भारतात बहुतेक लोक साधारणपणे password बरोबरच iloveyou, krishna, sairam, omsairam असे पासवर्ड वापरत असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर 12345, 123456, 123456789, 12345678, india123, 1234567890, 1234567, आणि abc123 असे पासवर्ड वापरतात. sweetheart, sunshine, lovely हे पासवर्डदेखील लोकांना सोयीचे वाटत असल्याने सर्रास वापरले जातात. त्यामुळे हॅकर्सचे काम सोपे होते आणि भारतातील 200 पैकी 62 जणांचे पासवर्ड एका सेकंदाच्या आत हॅक करणे शक्य असते.
आपले खाते हॅक होऊ नये, वैयक्तिक माहिती कुणाच्या हाती लागू नये, असे वाटत असेल तर त्यामध्ये स्मॉल लेटर्स, आकडे, कॅपिटल लेटर्स आणि चिन्हांचा वापर असे सगळे मिश्रण असणे आवश्यक असते. तुम्ही वर उल्लेख केल्याप्रमाणे सगळ्यांप्रमाणे सोपा पासवर्ड ठेवत असाल तर तो लगेच बदला आणि त्यातील काठीण्य वाढवा. म्हणजेच स्मॉल लेटर्स, आकडे, कॅपिटल लेटर्स, चिन्हे अशा सगळ्या गोष्टींचा समावेश पासवर्डमध्ये करून तो कुणालाही सहजासहजी हॅक करता येणारी नाही याची काळजी घ्या.
तरुण पिढीला Superman, Batman, Spider-Man, Wolverine, Iron Man, Wonder Woman असे पासवर्ड ठेवायला आवडते. अनेकांना आवडता अभिनेता आणि अभिनेत्रीच्या नावाने पासवर्ड ठेवला की लक्षात राहण्यास सोपे वाटते. अशा स्थितीत तुमची ब्राऊजिंग हिस्ट्री पाहून तुमचा पासवर्ड हॅक करणे सहज शक्य होते. अशा पासवर्डवरून तुमच्या खासगी गोष्टींपर्यंत पोचणे हॅकर्सच्या डाव्या हाताचा मळ असतो.