- पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अडीच हजार सोसायट्यांचे “डीम्ड कन्व्हेअन्स’
पिंपरी – शहरातील गृहनिर्माण सोसायट्या या कन्व्हेअन्स डीडबाबत बऱ्याच पिछाडीवर आहेत. शहरामध्ये असलेल्या सुमारे पाच ते सहा हजार सोसायट्यांपैकी अंदाजे 600 सोसायट्यांचेच “कन्व्हेअन्स डीड’ झाल्याचे दिसून येते. तर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड मिळून सुमारे 2500 हजार सोसायट्यांचे “डीम्ड कन्व्हेअन्स’ (मानीव अभिहस्तांतरण) झाले आहे.
गृहप्रकल्प उभारल्यानंतर आणि त्यातील घरांची विक्री झाल्यानंतर गृहनिर्माण सोसायटी स्थापन करण्यात येते. सोसायटी स्थापन केल्यानंतर ज्या जागेवर इमारत उभारलेली असते त्या जागेचीच मालकी सोसायटीकडे नसते. “कन्व्हेअन्स डीड’ केल्यानंतर ही मालकी सोसायटीकडे येते. याबाबत बऱ्याच सोसायट्या जागरूक नसल्याने “कन्व्हेअन्स डीड’ होण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याचे दिसून येत आहे.
शहरामध्ये सध्या पाच ते सहा हजार गृहनिर्माण सोसायट्या झाल्या आहेत. त्यातील अंदाजे 500 ते 600 सोसायट्यांनीच “कन्व्हेअन्स डीड’ केले आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे सदस्य सुदेश राजे यांनी दिली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे याबाबत माहिती घेतली असता त्याबाबत सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याची अधिकृत माहिती मिळू शकेल, असे सांगण्यात आले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 18 हजार गृहनिर्माण सोसायट्या आहेत. त्यातील 2 हजार 500 सोसायट्यांनी “डीम्ड कन्व्हेअन्स’ केले आहे. त्याशिवाय, जमिनीची मालकी असलेल्या सोसायट्या 3 हजार आहेत. त्यामध्ये प्राधिकरण आणि शासन मालकीच्या जागेतील गृहनिर्माण प्रकल्पांचाही समावेश आहे. “डीम्ड कन्व्हेअन्स’साठी पूर्वी 12 ते 13 कागदपत्रे लागत. सध्या केवळ 8 कागदपत्रेच लागत आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (पुणे शहर) कार्यालयातील प्रशासकीय सूत्रांनी दिली.
विविध कारणांमुळे अल्प प्रतिसाद
शहरामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 17 गावांमध्ये सध्या गृहप्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. बरेच गृहप्रकल्प पूर्ण झाले आहेत. नवी लोकवस्ती वाढली आहे. सोसायट्या स्थापन झाल्या आहेत. मात्र, “कन्व्हेअन्स डीड’ करून घेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामध्ये मुलभूत कारण म्हणजे जागरूकतेचा अभाव. सोसायट्यांना याबाबत माहिती असली तरीही अंतर्गत वाद, एकीचा अभाव आणि जागरूकता निर्माण करण्यात कमी पडत असलेला सहकार विभाग ही प्रमुख कारणे त्यामागे देता येतील.
कन्व्हेअन्स डीड : जमीनमालक, विकसक आणि सदनिकाधारक यांच्यामध्ये होणारा करार म्हणजे “कन्व्हेंअन्स डीड’. या करारानुसार सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नावे जमिनीची मालकी व हक्क हस्तांतरित केले जातात.
शहरातील एकूण सोसायट्यांपैकी कन्व्हेअन्स डीड किंवा डिम्ड कन्व्हेअन्स करणाऱ्या सोसायट्यांचे प्रमाण हे 5 टक्क्यांपर्यंतच आहे. त्यासाठी लागणारी कागदपत्रे सुटसुटीत असावी. तसेच, त्याची प्रक्रिया ही सुलभ करण्यात यावी. सहकार खात्याकडून देखील याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवे.
सुदेश राजे, सदस्य, पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन.