मुंबई – IPL 2023 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्धच्या धडाकेबाज खेळीनंतर रिंकू सिंग चर्चेत आला. कोलकाता नाईट रायडर्सच्या वतीने रिंकूने अशी खेळी खेळली, जी क्रिकेट चाहत्यांच्या नेहमी लक्षात राहील. 205 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, मॅच जवळजवळ संपूर्णपणे गुजरात टायटन्सच्या बाजूने होती. यानंतर रिंकूने अप्रतिम खेळी खेळली आणि ओव्हरच्या शेवटच्या पाच चेंडूत पाच सिक्स ठोकत केकेआरला विजय मिळवून दिला.
सामन्याच्या शेवटच्या षटकात केकेआरला विजयासाठी 29 धावांची गरज होती. अशा स्थितीत रिंकू सिंगने भारतातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये यश दयालच्या षटकातील शेवटच्या पाच चेंडूंवर षटकार खेचून आपल्या टीमला जिंकवलं. रिंकूने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकताच केकेआरच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला.
खरं सेलिब्रेशन यानंतर सुरु झालं. केकेआरकडून रिंकूच्या स्वागताचा आणि विजयाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ टीमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.रिंकू संघाच्या इतर खेळाडूंसह हॉटेलमध्ये पोहचला तेव्हा खेळाडूंसह एक भला मोठा केक देखील त्याची वाट पाहत होता. त्याने येताच केक कापला. अशात खेळाडूंनी त्याच्यावर शॅम्पेन उडवली.
View this post on Instagram
काय घडलं मॅचमध्ये?
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 4 गडी गमावून 204 धावा केल्या. गुजरातकडून विजय शंकरने नाबाद 63, साई सुदर्शनने 53 आणि शुभमन गिलने 39 धावा केल्या. त्याचवेळी कोलकाताकडून सुनील नरेनने तीन आणि सुयश शर्माने एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात कोलकाताने 20 षटकांत 7 गडी गमावून 207 धावा केल्या आणि सामना जिंकला. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने 83, नितीश राणाने 45 आणि रिंकू सिंगने नाबाद 48 धावा केल्या. गुजरातकडून राशिद खानने तीन आणि अल्झारी जोसेफने दोन बळी घेतले. जोशुआ लिटल आणि मोहम्मद शमीला प्रत्येकी एक विकेट मिळाली.