पुणे – महापालिकेतील हिरकणी कक्ष वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर पुन्हा सुरू झाला आहे. मुख्य इमारतीतील महिला कर्मचारी तसेच महापालिकेत कामानिमित्त येणाऱ्या स्तनदा मातांसाठी सन 2016 मध्ये हिरकणी कक्ष स्थापन केला होता. याठिकाणी स्तनदा मातांना बालकांना दूध पाजण्याची व्यवस्था तसेच आजारी असलेल्या महिलांना विश्रांती घेण्याची सोयही होती. तळमजल्यावर हा कक्ष होता. (पूर्वीचा नागरवस्ती विभाग) हा कक्ष बऱ्याचदा बंदच असायचा.
इतकेच नव्हे तर ठळकपणे कोठेच लिहिले नसल्याने येथे हिरकणी कक्ष आहे, हे महिलांना माहितीच नव्हते. तत्कालिन नगरसेविका रुपाली पाटील यांनी आंदोलन करून हा कक्ष सुरू केला. परंतु तो पुन्हा बंद करण्यात आला. प्रेरणा देशभ्रतार या अतिरिक्त आयुक्त असताना त्यांनी हिरकणी कक्ष पुन्हा सुरू केला होता. पण, तो पुन्हा बंद करण्यात आला. अखेर राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सोमवारी कक्ष सुरू केला.
हिरकणी कक्ष सुरू करण्याबाबत मी महापालिका प्रशासकांना 21 डिसेंबर 2022 रोजी पत्र दिले होते, मात्र हालचाल झाली नाही, मग मी राज्य महिला आयोगाला तक्रार केली. त्यांनी याची दखल घेऊन हिरकणी कक्ष तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. पुन्हा तक्रार केल्यानंतर राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्र लिहून 26 जून रोजी महापालिकेत हा कक्ष स्थापन झाला की नाही ते पाहण्यासाठी येणार असल्याचे कळवले. त्यानंतर मात्र वेगाने सूत्रे हलली, असे सजग नागरी मंचचे विवेक वेलणकर यांनी सांगितले.