- मुळशी तालुक्यातील तीन प्राथमिक शाळांना भेटी
हिंजवडी – करोना महामारीनंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुळशी तालुक्यातील 3 प्राथमिक शाळांना भेटी दिली. या वेळी शिक्षण मंत्री गायकवाड यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला. हिंजवडी प्राथमिक शाळेची नियोजनबद्धता व गुणवत्ता पाहून त्या भारावून गेल्या.
बालभारतीच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त त्या पुण्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, राज्याचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, संचालक दिनकर टेमकर, शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे, सह संचालिका मीना शेंडकर, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे, मुळशीचे गटशिक्षणाधिकारी माणिक बांगर, विस्तार अधिकारी सचिन लोखंडे, केंद्रप्रमुख सुरेश साबळे, हिंजवडी तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष साखरे, मुख्याध्यापक हरिभाऊ वाघुलकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा जयश्री काकडे, ग्रामविकास अधिकारी तुळशीदास रायकर यांच्या सह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दौऱ्याच्या सुरुवातीला त्यांनी म्हाळुंगे शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. करोनाकाळात घरी घेत असलेले ऑनलाइन डिजिटल शिक्षण चांगले, की शाळेत येऊन घेणारे प्रत्यक्ष शिक्षण? या प्रश्नावर मुलांनी शाळेतील शिक्षण चांगले असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या.हिंजवडीत झालेल्या पालकसंवाद कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या, करोना संकटांनतर मुलांना शाळेत पाठविण्याचे धाडस तुम्ही दाखविल्याबद्दल शिक्षण विभाग पालकांचा ऋणी राहील. देशाचे भवितव्य जसे शिक्षकांच्या हातात आहे त्यात पालकांचा देखील मोलाचा वाटा आहे. बहुतांश मुले घरून शिक्षण घेऊन कंटाळल्याचे जाणवले. त्यामुळे शाळा सुरू करत असताना मुलांची काळजी घ्यायची जबाबदारी आमची देखील आहे. करोनाकाळात काय काय काळजी घ्यायची, त्यांनी कशी खबरदारी घ्यायची हे शिक्षकाप्रमाणे पालकांनी देखील मुलांमध्ये चांगल्या पद्धतीने रुजवले आहे याची प्रचिती आली.तत्पूर्वी पुण्यातील बालभारतीच्या वर्धापनदिनाचा सोहळा हिंजवडीच्या मुलांनी डिजिटल क्लासरूममध्ये ऑनलाइन पद्धतीने अनुभवला. सूत्रसंचालन उपशिक्षका ज्योती दवणे यांनी केले.
रेखाटलेले स्वचित्र पाहून मंत्रीमहोदय भारावल्या….
या वेळी महेश्वरी आखडकर या हिंजवडी शाळेतील माजी विद्यार्थिनीने शिक्षण मंत्र्यांचे हुबेहूब चित्र रेखाटून त्यांचा फोटो मंत्रीमहोदयांना भेट दिला. स्वतःचा रेखाटलेला फोटो पाहून त्या भारावून गेल्या.
आदर्श शाळांमध्ये हिंजवाडीसारख्या शाळांचा समावेश करा
हिंजवडी शाळेतील, डिजिटल क्लास रूम, ई-लर्निंग कक्ष, स्वतंत्र वाचनालय, प्रयोगशाळा आशा सोयीसुविधा तसेच शिस्तबद्धता, टापटीपपणा व मुलांची गुणवत्ता पाहून त्या म्हणाल्या आशा शाळाचे प्रस्ताव राज्याच्या शिक्षण विभागाकडे पाठवा. जेणेकरून आदर्श शाळांची संकल्पना अशाच शाळांबाबत लागू होईल. आशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. त्या म्हणाल्या, या शाळेत आणखी काही अभिनव उपक्रम राबविता येईल का याचे ही नियोजन करा.
सगळेच अधिकारी होणार मग मंत्री कोण होणार?
वर्गनिहाय मुलांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, भविष्यात तुम्ही कोण बनणार? यावर कुणी डॉक्टर, इंजिनिअर, वकील, आयटी अभियंता, कुणी कलेक्टर तर कुणी शिक्षक बनण्याची इच्छा व्यक्त केली. यावर हसून त्या म्हणाल्या, तुमच्यापैकी मंत्री व्हावं अस कुणाला वाटत नाही का? यावर एकच हशा पिकला.
राज्यातील शाळांना प्रेरणा देणारी शाळा
राज्याच्या शिक्षण विभागाने करोनानंतर आनंददायी वातावरणात शाळा सुरू करण्यासाठी तयार केलेल्या शिक्षण विभागाच्या चित्रफितीत (जाहिरातीत) हिंजवडी शाळेचे शूटिंग करण्यात आले आहे. त्यामुळेच ही शाळा पाहण्याची इच्छा शिक्षण मंत्र्यांनी व्यक्त केली होती. येथील गुणवत्ता पाहून त्यांनी शाळेचे तोंडभरून कौतुक केले.