सोलवॅंह, (अमेरिका) – दक्षिण कॅलिफोर्नियात लागलेल्या वणव्यामुळे महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. सुमारे 200 फायरफायटर या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ही आग किनारपट्टीवरील सॅंटा बार्बरा प्रांतात 12.5 चौरस मैल परिसरामध्ये पसरली आहे.
ही आग सोमवारी भडकली आणि वाऱ्याबरोबर समुद्रकिनाऱ्यावर झपाट्याने पसरली. त्यामुळे या भागातील एकमेव महामार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागला आहे. या भागातील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही भागातील वाऱ्याचा वेग ताशी 70 मैल इतका असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे आणखीन अवघड होते आहे.
नॉर्थ कॅलिफोर्नियातील 25 छोटी घरे या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. आणखीन 20 इमारतींना धोका निर्माण झाला आहे. आतापर्यंत या आगीत जीवितहानी झालेली नाही. या आगीमागील नेमके कारणही स्पष्ट होऊ शकलेले नाही. आगीमुळे सुमारे 23 हजार घरांचा वीजपुरवठा खंडीत करावा लागला आहे. आणखीन 29 हजार घरांचा वीजपुरवठा खंडीत करावा लागणार आहे.