पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, पुण्यात आज या हंगामातील उच्चांकी 43 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. वडगावशेरी येथे उच्चांकी तापमान नोंदविण्यात आले आहे. तर शहराच्या मध्यवर्ती भागातील उष्णतेचा पाराही 41 अंशावर पोहचल्याने पुणेकरांना चटका सोशेनासा झाला आहे. त्यामुळेच दिवसभर शहरातील रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळत आहे.
शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमानात 15 मार्चनंतर वाढ होऊ लागली. महिना अखेरीस शिरूर येथे उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यावेळी पुणे शहर परिसरातील कमाल तापमान 40 ते 41 तर मध्यवर्ती भागात 38 अंश सेल्सिअस इतके होते. मात्र, मागील 48 तासात वाढलेल्या कमाल तापमानाने नवीन उच्चांक गाठला आहे.
वडगावशेरी येथे हंगामातील उच्चांकी 42.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ कोरेगांव पार्क येथे 42.8 तर शिरूर तालुक्यात 42.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, शहरात पुढील दोन दिवस कमाल तापमानात किंचित वाढ होईल. तर दुपारनंतर आकाश ढगाळ राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
काही प्रमुख भागातील कमाल तापमान
वडगावशेरी – 42.9, कोरेगाव पार्क – 42.8, शिरूर – 42.3, चिंचवड आणि राजगुरूनगर – 41.9, हडपसर – 41.8, मगरपट्टा आणि शिवाजीनगर – 40.8, एनडीए आणि पाषाण 40.4 अंश से.