पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गिरिप्रेमीच्या नवोदित गिर्यारोहकांच्या माउंट थेलू मोहिमेचा ध्वज प्रदान सोहळा पार पडला. निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले आणि मार्क्स टेक्नोसिस्टीम्स प्रा. लि. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक धीरेन गुप्ते यांच्या हस्ते मोहीम नेता अखिल काटकर याच्यासमवेत संघ सदस्य अभय खेडकर, राहुल सोनके, मनोज कुलकर्णी, मिहीर जाधव, यश हांगे व निकुंज शाह यांना ध्वज प्रदान करण्यात आला.
या वेळी गिरिप्रेमीचे विश्वस्त व संस्थापक आनंद पाळंदे, संस्थापिका अध्यक्षा उषःप्रभा पागे, संस्थेचे विद्यमान अध्यक्ष जयंत तुळपुळे, सचिव विवेक शिवदे व जेष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे उपस्थित होते.
गोखले यांनी नेहमीप्रमाणे गिरिप्रेमीचा संघ यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला. धीरेन गुप्ते यांनी संघाला मानसिक कणखरतेवर भर देण्याचा कानमंत्र दिला. या वेळी अंध युवकांच्या अनोख्या हिमालयीन सफर या ट्रेकचा बॅनर प्रदान करण्यात आला,
तसेच डॉ. सुमित मांदळे लिखित यशोगाथा अन्नपूर्णाची या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन पार पडले. सूत्रसंचालन निकुंज शाह, तर अभय खेडकर यांनी आभार मानले.