श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. तो हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेचा सदस्य होता. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर शोध मोहीम हाती घेणारे सुरक्षा जवान दहशतवादी दडलेल्या ठिकाणी पोहचले.
जवानांनी केलेले शरण येण्याचे आवाहन फेटाळून दहशतवाद्याने गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये शाहजाद नावाचा दहशतवादी ठार झाला. त्याच्याकडील एके-47 रायफल, ग्रेनेड जप्त करण्यात आले. एक पोलीस अधिकारी आणि काही भाजप नेत्यांवरील दहशतवादी हल्ल्यांत शाहजाद सामील होता. त्यामुळे त्याचा खात्मा सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे.