नवी दिल्ली – कॅलिपोर्नियाच्या दक्षिणेकडील मोजावे डेजर्ट या वाळवंटामध्ये एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये एकूण ६ जण ठार झाले. त्यात नायजेरीयाच्या ऍक्सेस बँकेचे सीईओ हर्बर्ट विग्वे हे देखील ठार झाले आहेत. त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक आणि नायजेरियाचे पूर्वीचे अर्थमंत्री एनगोजी ओकोन्जो-इवेला यांनी एका पोस्टमध्ये दुजोरा केला आहे.
हे हेलिकॉप्टर हॅलोरन स्प्रिंग्स रोडजवळ सकाळी १० वाजणअयाच्या सुमारास कॅलिफोर्निया-नेवाडा सीमेजवळ कोसळले. हे ठिकाण लास वेगासपासून सुमारे १२५ किलोमीटर अंतरावर आहे.
हे हेलिकॉप्टर कोसळण्यामागील कारणांचा तपास फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डच्यावतीने केला जातो आहे. घटनास्थळी कोणीही जिवंत आढळले नसल्याचे कॅलिफोर्नियाच्या शेरीफच्या कार्यालयाने म्हटले आहे. मात्र यासंदर्भात अधिक माहिती देण्यास नकार देण्यात आला.