शर्मिला जगताप
इंग्रजीत लिहिलेली दोन पुस्तके बालवयात वाचावयास मिळाली. त्यात “रॉबिन्सन क्रूसो’ आणि “गलीव्हर्स ट्रॅव्हल्स’ ही दोन पुस्तके होती. एक इंग्रज समुद्र पर्यटन करीत असताना शिडे असलेली त्याची लाकडी बोट तुफानात सापडली व खडकावर आदळली. सुदैवाने तो इंग्रज वाचला आणि निर्जन बेटावर लाटाबरोबर जाऊन पडला. पुढे त्या बेटावर तो अनेक वर्षे राहिला. त्या साहेबाचे नाव रॉबिन्सन क्रूसो असे होते. ही कथा बालमनाला फार आनंद देणारी आहे.
दुसरी गोष्ट गलीव्हरची. गलीव्हर असाच एक प्रवासी होता.
त्याची बोट एकदा अशा ठिकाणी लागली की त्या देशात वीस-पंचवीस फूट उंचीची माणसेच सर्वत्र होती. या प्रचंड उंचीच्या लोकांत काही काळ वास्तव्य केल्यावर गलीव्हर मायदेशी परत आला. पुनः प्रवासास निघाला आणि गलीव्हरच एक दशांश उंचीच्या म्हणजेच अत्यंत लहान उंचीच्या माणसांच्या राज्यात जाऊन पडला.
उंची खूप किंवा उंची कमी एवढाच फरक. बाकी दोन्ही तऱ्हेच्या लोकांची राहणी साहेबांसारखीच होती. खुर्च्या, टेबल, घरे, सगळी प्रचंड किंवा लहान. उंच लोकांच्या खुर्चीवर चढण्यासाठी गलीव्हरला शिडी लागली तर बुटक्या लोकांच्या समुद्रात गलीव्हर कमरेपेक्षा अधिक बुडतच नव्हता. डॅनिअल डीफो यांनी लिहिलेली ही काल्पनिक गोष्ट लहानथोरांना आवडते. अलीकडे गलीव्हरची कथा चित्रपटांमध्ये पाहावयास मिळते.
लंडन शहरात विलायतेच्या राणीसाहेबांचा बॅकिंगहॅम नावाचा राजवाडा आहे. तेथील राजरक्षक शिपायांच्या तुकडीला ग्रेनेडिअर गार्डस् म्हणतात. या तुकडीतील प्रत्येक शिपाई साडेसहा फूट उंचीचा असावा लागतो. अशा उंच शिपायाच्या डोक्यावर मेंढीच्या सकेश कातड्याची फूटभर उंचीची टोपी असते. त्यांचा पोषाख फारच भपकेदार असतो. अशा या उंच रक्षकांमुळे राजवाड्याला विशेष शोभा येते.
मनुष्याची उंची वाढविण्याचे काम अनलिका ग्रंथीकडे असते. ही ग्रंथी आकाराने लहान असून, डोक्यात मेंदूखाली असते. काही अतिउंच म्हणजे सात-आठ फूट उंच माणसे मृत झाल्यावर त्यांच्या शवांचे छेदन करण्यात आले, तेव्हा या उंच माणसांच्या पिट्युटरी ग्रंथी आकाराने बऱ्याच मोठ्या असल्याचे दिसून आले. मुलामुलींच्या शरीराची वाढ होण्याच्या काळात गुडघ्याच्या वाटीखाली टिबिया नावाच्या हाडावर एपिफीजल रेघ एक्स रे फोटो काढला असता दिसते. वाढ पूर्ण झाली की ही रेघ अदृश्य होते.
समाजामध्ये स्त्री ठेंगू असली तरी चालते, पण पुरूष कमी उंचीचा म्हणजे ठेंगू असला तर त्याच्याकडे सर्वांचे लक्ष जाते. ठेंगू माणसाला सैन्यात प्रवेश मिळत नाही. पोलिसांची निवड केली जाते तेव्हाही किमान साडेपाच फुटांपेक्षा अधिक उंची असलेली माणसं निवड केली जातात. ठेंगू माणसाला आपण ठेंगू आहोत याचा कमीपणा वाटायला नको. कारण आपली उंची आपल्या कार्यकर्तृत्वावरच ठरते.