मुंबई – जागतिक पातळीवर आर्थिक आघाडीवर अनेक नकारात्मक घटना घडून येत असल्यामुळे अनेकांना जागतिक मंदीची चाहूल लागली आहे. त्यामुळे अमेरिका, युरोपसह जागतिक शेअर बाजारात तुफान विक्री होऊन शेअर निर्देशांक कोसळत आहेत. शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातही मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,115 अंकांनी कोसळला होता. बाजार बंद होताना सेन्सेक्स 866 अंकाने कमी होऊन 54,835 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 271 अंकांनी कोसळून 16,411 अंकावर बंद झाला.
अमेरिकेच्या व्याजदर वाढीमुळे अमेरिकेचे शेअर बाजाराच्या निर्देशांक कोसळत असतानाच इंग्लंडच्या रिझर्व बॅंकेने व्याजदरात वाढ करून जागतिक मंदीची भीती व्यक्त केली असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बजाज फिन्सर्व, ऍक्सिस बॅंक, नेस्ले, विप्रो, एचडीएफसी, एचडीएफसी बॅंक, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यानी सपाटून मार खाल्ला. महिंद्रा, पावर ग्रीड, आयटीसी, स्टेट बॅंक, सनफार्मा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. आठवड्याच्या पातळीवर सेन्सेक्स 2,225 अंकांनी म्हणजे 3.89 अंकांनी कोसळला.
अगोदरच महागाई वाढत असताना क्रूड तेलाचे दर आणखी वाढल्यामुळे आणखी महागाईत वाढ होण्याची भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे. मुख्य निर्देशांकाबरोबर आज स्मॉल कॅप 2.10 टक्क्यांनी तर मिड कॅप 2.06 टक्क्यांनी कोसळला. रिऍल्टी क्षेत्राचा निर्देशांक व्यादरवाढीमुळे 3.53 टक्क्यांनी कोसळला. धातू क्षेत्राचा निर्देशांक 3.10 टक्क्यांनी, ग्राहक वस्तू क्षेत्राचा निर्देशांक 2.40 टक्क्यांनी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक 2.27 टक्क्यांनी कोसळला.
परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने मार्च महिन्यात पाव टक्के व्याजदर वाढ केली होती. पुन्हा काल फेडरल रिझर्व्हने अर्ध्या टक्क्याची व्याजदर वाढ केली. त्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतातून गुंतवणूक काढून घेत आहेत. काल या गुंतवणूकदारांनी 2,074 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली. परदेशी गुंतवणूकदारांची भारतातील शेअर बाजारात साधारणपणे 18 टक्के इतकी गुंतवणूक आहे. रुपया कोसळत राहिल्यास आणि अमेरिकेत व्याजदर वाढ होत राहिल्यास हे गुंतवणूकदार आणखी परत जाण्याची शक्यता आहे.