कोल्हापूर – पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावर एका चिमुकल्याचा चारचाकी गाडी खाली येऊन मृत्यू झाला आहे. इंद्रनील अरुण दबडे असे या मुलाचे नाव होते. तो अवघ्या 2 वर्षांचा होता. या अपघातानंतर इंद्रनीलच्या परिवारावर शोककळा पसरली आहे.
अपघाताननंतर इंद्रनीलला स्थानिकांच्या मदतीने पन्हाळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथे उपचार होत नसल्याने इंद्रनीलला पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र यावेळी रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली नाही. अखेर इंद्रनीलची मृत्यूची झुंज अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं ?
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील खानापूर येथील दबडे कुटूंबीय पन्हाळगड पर्यटनासाठी गेले होते. पन्हाळागडावर पर्यटनासाठी आलेल्या दबडे कुटुंब चहा पिण्यासाठी तबक उद्यानासमोर थांबले होते. यावेळी इंद्रनीलने आईचा हात सोडून रस्ता ओलांडून आजोबांकडे जात होता. मात्र त्यादरम्यान समोरून येणाऱ्या MH45AL6203 या चारचाकी गाडीने इंद्रनीलला जोराची धडक दिली. ही गाडी सुधीर कुमार हांडे हे चालवत होते. यावेळी गाडीच्या पुढच्या चाकात इंद्रनील अडकल्याने तो गंभीर जखमी झाला होता.
दरम्यान, पन्हाळगडावर अशा घटना पहिल्यांदाच घडली आहे. मात्र रस्त्यावरील अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंगमुळे घडणाऱ्या अपघातांना वेळीच आळा घातला पाहिजे. यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे. या घटनेनंतर रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.