नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पदवी प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पुनरावलोकन याचिकेवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. आता ही सुनावणी 21 जुलै रोजी निश्चित करण्यात आली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात 31 मार्चच्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याची मागणी केली आहे. या निर्णयात गुजरात उच्च न्यायालयाने पंतप्रधान मोदींच्या पदवीशी संबंधित तपशील देण्याचे मुख्य माहिती आयुक्तांचे आदेश रद्द केले होते.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केजरीवाल यांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र वाचण्यासाठी वेळ मागितल्यानंतर न्या. बीरेन वैष्णव यांनी सुनावणी पुढे ढकलली. तुषार मेहता यांनी न्यायालयाला माहिती दिली की, सदर सुनावणी सुरू होण्यापूर्वी त्यांना हे प्रतिज्ञापत्र प्राप्त झाले आहे. ज्यात न्यायालयाच्या मागील सुनावणीचा उतारा आहे.
या प्रकरणात सुरुवातीपासून बेजबाबदार विधाने केली जात आहेत. कदाचित, या प्रतिज्ञापत्रात देखील ते असतील. तसेच केजरीवाल यांच्या प्रतिज्ञापत्रात मागील सुनावणीच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगचा उतारा देखील असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर दोन्ही युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर सुनावणी पुढील तारखेपर्यत स्थगित करण्यात आली.