इंदोर – मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये एका तरुणाने आधी विष देऊन कुटुंबीयांची हत्या केली आणि त्यानंतर गळफास लावून घेतला. अमित यादव असे मृताचे नाव आहे. आधी त्याने पत्नी टीना यादव आणि तीन वर्षांची मुलगी आणि दीड वर्षाच्या मुलाची विष देऊन हत्या केली आणि नंतर गळफास लावून घेतला. चार जणांच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली. सुसाईड नोटमध्ये कर्जामुळे त्रस्त असल्याचे म्हटले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. इंदूरच्या बाणगंगा पोलीस स्टेशन हद्दीतील भगीरथपुरा पोलीस चौकी परिसरात राहणाऱ्या अमित यादवने कर्जाला कंटाळून पत्नी आणि मुलांची विष पाजून हत्या केली आणि नंतर गळफास लावून घेतला.
दरम्यान, मध्य प्रदेशातील सागर येथील रहिवासी असलेल्या अमित यादवने मंगळवारी सकाळी त्याच्या कुटुंबीयांचा फोन उचलला नाही, तेव्हा भगीरथपुरा येथे राहणाऱ्या त्याच्या सासरच्या मंडळींना कळवण्यात आले. यानंतर सासू-सासरे व कुटुंबीय भाड्याच्या खोलीवर पोहोचले असता कोणीही दरवाजा उघडत नव्हते. अशा स्थितीत बाणगंगा पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला असता, अमित यादवचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. शेजारीच दोन्ही मुले आणि पत्नी बेडवर बेशुद्धावस्थेत पडलेले होते. त्याची नाडी तपासली असता त्याचासह सर्व मृतावस्थेत आढळून आले. डीसीपी धर्मेंद्र भदौरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित टॉवर कंपनीत तांत्रिक आणि सेटअपचे काम करायचा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अमितचे सासरे जवळच आहेत. रोजचे जेवण त्यांच्यासोबत होते. त्यानंतर फक्त झोपण्यासाठी खोली भाडयाने घेतली होती. एक दिवस आधी ते उज्जैन महाकाल मंदिरात जाऊन शाही सवारीमध्ये सहभागी झाले होते. तेथून परतल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला नाही. घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली असून, त्यात कर्जाचा उल्लेख आहे.
सुसाईड नोटमध्ये अमित यादव यांनी अनेक कंपन्यांकडून कर्ज घेतल्याचा उल्लेख केला आहे, जे देण्यास ते असमर्थ आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अमितची वागणूक सर्वांशी चांगली होती आणि आजूबाजूला कोणाशीही वाद नव्हता. एकाच वेळी चार जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.