इस्लामपूर – जमिनीचा बनावट दस्त करुन फसवणूक केल्याप्रकरणी कर्ण वसंत येवले(४७,कोट भाग वाळवा) व अमीर वासुद्दीन हवालदार(२८,मणेर गल्ली, इस्लामपूर) या दोन आरोपींना चौथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.डी. जाधव यांनी ही शिक्षा सुनावली. तर तिघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या गुन्ह्यात दहा आरोपींचा समावेश होता.येवले याला तीन तर हवालदार याला दोन वर्षे सक्तमजुरी देण्यात आली.
इस्लामपूर-वाघवाडी फाटा दरम्यान कोल्हापूर रस्त्याकडेला श्रीकांत कृष्णा डांगे यांची ही कोट्यवधी रुपयांची ही मोक्याची जागा होती. पेठ हद्दीत गट नं.६०६ मध्ये २ हे.४५ आर ही जमीन येवले याने डांगे यांचे बोगस आधार कार्ड व पॅन कार्ड काढून विक्री केली होती. त्याने प्रिती नंदराज चव्हाण व संजय रामचंद्र घाडगे यांना खरेदी दस्त करुन दिला होता. यामध्ये स्टॅम्पव्हेंडर म्हणून शिवप्रसाद कळसकर हे होते. याशिवाय साक्षीदार म्हणून मानाजी उर्फ मनोज शंकर पाटील हे होते.
न्यायालयाने कळसकर,पाटील अन्य एकास निर्दोष मुक्त केले. जमीन खरेदी देणारा कर्ण येवले हा बोगस आहे, हे माहीत असूनही हवालदार याने हा व्यवहार जुळवून आणला.डांगे यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर न्यायाधीश जाधव यांच्यासमोर येवले, हवालदार, पाटील व कळसकर यांच्या विरुद्ध काम चालले.या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील के.ए. कोळी यांनी काम पाहिले.
न्यायाधीश जाधव यांनी येवले यास दोषी धरुन तीन वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड व हवालदार यास दोन वर्षे सक्तमजुरी व १० हजार सातशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.दंडाच्या रकमेतील ४० हजार रुपये फिर्यादी डांगे यांना देण्याचे आदेश न्यायाधीश यांनी केले आहेत.