दुर्गम आणि डोंगरी तालुका म्हणून राज्यात भोरची ओळख आहे. त्यातच वैद्यकीय सुविधांची वानवा असताना, ग्रामीण जनतेशी नाळ आणि सामाजिक बांधिलकीतून वैद्यकीय क्षेत्रांत सेवा देणारे हरजीवन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून अग्रक्रमाने नाव घेतले जाते. वर्ष 1977 मध्ये डॉ. उदय शेठ यांनी हरजीवन हॉस्पिटलची मुहूर्तमेढ रोवली.
डॉ. उदय शेठ यांच्या वैद्यकीय सेवेचा वसा त्यांचे पुत्र डॉ. अमित शेठ हे समर्थपणे सांभाळत आहेत. शहरातील वैद्यकीय सेवेतील लाभाचा मोह सोडून त्यांनी भोरच्या भूमीत आरोग्यसेवेचा ध्यास घेतलला आहे. दैनिक प्रभातच्या डॉक्टर डेनिमित्त विशेषांकात हरजीवन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील आरोग्यसेवेचा वृत्तांत….
डॉ. उदय शेठ यांनी भोरमध्ये वर्ष 1977 मध्ये सुरू केले. त्यांनी हरजीवन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या. त्यांचा मुलगा डॉ. अमित यांनी भोरमध्येच व्यवसाय करावा, अशी त्यांची इच्छा होती. परंतु डॉ. अमित यांनी एमबीबीएस पदवी घेतल्यानंतर पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची नोकरी सुरू केली. मात्र, त्यावेळी भोरमधील दोन ज्येष्ठ नागरिक पुण्यात उपचार घेण्यासाठी वेळेत न पोहोचल्याने मृत्यू पावल्याचे डॉ. अमित यांनी पाहिले आणि त्यानंतर भोरमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुरू करण्याचा निर्धार करून ते 2010 मध्ये पुन्हा भोरला आले. त्यांनी हरजीवन हॉस्पिटलमध्ये भोरमधील पहिले आयसीयू युनिट, व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन मशीन, डायलेसिस सेंटर सुरू करून अनेक नागरिकांचे प्राण वाचविले.
डॉ. अमित शेठ यांनी भोरमध्येही मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पुण्यासारखी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा भोरच्या वैद्यकीय क्षेत्रात सर्वप्रथम आणली. आयुसीयू युनिट, व्हेटिंलेटर, सीटी स्कॅन मशीन, डायलेसिस सेंटर आणि कार्डियाक ऍम्ब्युलन्स सुरू करीत रुग्णांना दर्जेदार सेवा दिली जात आहे. भोर तालुक्यातील पहिला रुग्ण शोधणारा करोना शिलेदार डॉक्टर म्हणजे हरजीवन हॉस्पिटलचे डॉ. अमित शेठ होय.
हजारो रुग्णांना मृत्यूच्या दारातून परत आणणारे डॉ. अमित शेठ यांनी करोनाच्या साथीत प्रशासनाला केलेले सहकार्य आदर्शवत आहे. येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात प्रशासनाने उभारलेल्या डेडीकेटेड कोविड सेंटरमधील वैद्यकीय उपकरणे बसविण्यासाठी व कार्यान्वित करण्यासाठी त्यांनी विशेष सहकार्य केले आहे.
करोनाच्या काळात हॉस्पिटलमधील आठ बेड हे कोविड रुग्णासाठी राखीव ठेवले होते. करोनाच्या कालावधीत काही दवाखाने बंद होते. परंतु डॉ. अमित शेठ यांनी रुग्णासाठी हरजीवन हॉस्पिटल दररोज सुरू ठेवले. सरकारच्या उपजिल्हा रुग्णालयात कोविड केअर सेंटर्स सुरू केल्याने इतर आजारांच्या रुग्णांना उपचार मिळणे अवघड झाले. त्यावेळी डॉ. अमित शेठ यांनी हदयविकार, अर्धांगवायू, सर्पदंश, विषबाधा आदी प्रकारच्या अत्यावश्यक सेवांच्या रुग्णांवर अल्पदरात उपचार केले. पावसाळ्यात त्यांनी सर्पदंश झालेल्या दोनशेपेक्षा जादा रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत.
डॉ. अमित शेठ यांनी पुण्यासारख्या अत्याधुनिक वैद्यकीय सेवा भोरमध्ये दिल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत. डॉ. उदयशेठ हे आजही सेवा देत आहेत. त्यांच्या सुरुवातीच्या काळातील अनेक रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी आजही येतात. त्यामुळे डॉ. उदयशेठ हे आज रुग्णसेवेत तत्पर आहेत. डॉ. अमितशेठ यांच्या पत्नी डॉ. स्वप्नाशेठ याही हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेचा वसा पेलत आहेत.
डॉ. अमित शेठ यांच्या मातोश्री नीलाताई उदय शेठ हे हॉस्पिटलचे व्यवस्थापन कुशलतेने सांभाळत आहेत. करोनासाठी प्रशासनाला सहकार्य करून करोनाचा पहिला रुग्ण शोधून करोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी स्वखुशीने वेळ देणारा डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे करोना लढ्यातील उत्तम शिलेदार असणाऱ्या डॉ. अमित शेठ यांना हार्दिक शुभेच्छा.